Friday, November 18, 2011

स्वर माधुरीच्या मंदिरात

त्या स्वरातलं माधुर्य
जाणवलं कितीदा तरी


सहज बोलताना
निर्मळ हसताना
नातवंडाना लटके रागवताना
क्लासमध्ये शिकवताना
स्वर-शिल्प उभारताना
अनवट राग आळवताना

पण कालच्या मैफिलीत
होता फक्त अमूर्त स्वर.
अन एकेका स्वर लडी मधून
घडत होत सुंदर स्वर मंदिर!

वाटलं जगात या क्षणी
एकच शाश्वत सत्य
तो म्हणजे फक्त हा "स्वर"
शुद्ध...नितळ...सात्विक...
अस्तित्वाच्या जाणिवा
विसरून टाकणारा...
पारलौकिकाचा स्पर्श
झालेला दैवी "स्वर".

मनात आलं, कशासाठी करायचा
अनवट रागांचे रागनियम
लयकारीचे गणित
सरगम ओळखण्याचा अट्टाहास?

मला या स्वरातले निखळपण कळले आहे
मी या स्वरापर्यंत पोहोचते आहे
मी हा स्वर माझ्यामध्ये अनुभवते आहे
अन कदाचित मीच हा "स्वर" झाले आहे.

Tuesday, August 16, 2011

१५ ऑगस्ट...

एक असतो १५ ऑगस्ट. बालपणीचा.
स्वच्छ गणवेशाचा.
सावधान-विश्राम करता करता
ठोकलेल्या सल्युटचा.
निळ्या आभाळात फडकणाऱ्या
तिरंग्याकडे बघताना
वाटलेल्या अभिमानाचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. तरुणाईचा.
Happy Independence Day!
असं एकमेकांना wish करण्याचा.
patriotic feelings
facebook वर update करण्याचा.
कुठल्यातरी social cause साठी
मेणबत्ती पेटवण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट.सर्वसामान्यांचा.
सकाळी आरामात उठण्याचा.
बायको पोरांना पिकनिकला नेण्याचा.
जमलच तर मित्र मंडळीत
ओली पार्टी करण्याचा.
मॉलमध्ये चालता चालता
"ए मेरे वतन के लोगो" च्या
fusion song ला टाळी देण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. राजकारण्यांचा.
कडक इस्त्री केलेला खादी पेहराव
अंगावर चढवण्याचा.
दहशतवाद, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
अश्या डरकाळ्या फोडण्याचा.
शहीद-गरीब-बाल कल्याणाच्या नव्या योजना
जाहीर करून मोठा घोटाळा करण्याचा.
 
कधी असेल मग १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या जयघोषाचा?
बलिदानाच्या वेदीवर चढलेल्या क्रांतिकारकांचा?
सीमेवर एकाकी लढणाऱ्या सैनिकांचा?
इंग्रजी सत्तेला नमवणाऱ्या राष्ट्रभक्त नेत्यांचा?
अजूनही दिलेले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे करणाऱ्या  नागरिकांचा?
"हम होंगे कामयाब एक दिन" या विश्वासाचा?
अखंड, अतुल्य, अन अजिंक्य हिंदुस्तान या स्वप्नाचा?
 

Wednesday, August 3, 2011

श्रावणसखा...

"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत.  तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना.  पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली.  तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
 
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता.  एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची.  मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा.  तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच.  तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची.  तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा.  श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे.  जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
 
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच.  "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली.  ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही.  मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो.  जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात.  शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
 
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत.  आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके'  असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
          "बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
           बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम.  मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...

Thursday, February 17, 2011

अडगळ....


नव्या वर्षाची नवी डायरी
पानं सगळी करकरीत कोरी

वर्ष नवे संकल्प नवे
विचार नवे काव्य नवे
लिहू म्हटलं त्यावर काही
जे सगळ्यांना हवे हवे

जापनीज मनेजमेंट मधले
५ एस होते कुठेतरी डोक्यात
म्हणून पहिल्याच पानावर अक्षर लिहिले
" अडगळ"
अन क्षणभर त्याकडे बघत राहिले.
शब्द तसा काना,मात्रा आणि वेलांटीही नसलेला
पण अर्थ-चित्र-आठवणीनी फेर धरलेला.

शब्दकोशात अर्थ साधा सोपा.
नको असलेले, जागा अडवून बसलेले
कालबाह्य, उपयोग मूल्य नसलेले
असं बरंच काही....

डोळ्यांसमोरचे चित्र मात्र भारीच सुंदर
आजोळच्या घरातली ती अडगळीची खोली.
तिथला तो धुळकट गंध
उन्हाच्या कवडशात चमकणारी कोळीष्टक.

तिथ सापडलेली रिबीन आणि आकडा
फुटलेली पाटी अन पेन्सिलचा अर्धा तुकडा.
एकेक वस्तूच्या शंभर आठवणी
शाळेतले दिवस, अभ्यास आणि मैत्रिणी.

 क्लासमध्ये शिक्षक जेंव्हा शिकवत होते
जापनीज मनेजमेंट मधले 5 एस टेक्निक
'सेईरी' म्हणजे अडगळ आधी फेकून द्या
पुन्हा पुन्हा म्हणत होते.

म्हटलं मनाशी खरंच एकदा
काढून टाकू सगळीच अडगळ.

मनाला काजळी आणणारी
स्वार्थी, निराशावादी विचारांची अडगळ

समाजातील भ्रष्टाचार, जातीयवाद,
अन दहशतवादाची अडगळ.

पैशाच्या लोभापायी नातं विसरणारी
घोटाळे घडवणारी आर्थिक अडगळ.

माणुसकीला काळिमा फासणारी
सामाजिक अडगळ.

वरवर पाहता सर्व स्वच्छ झाले
अडगळीचे ढीग मात्र तसेच राहिले
कारण फेकून दिलेल्या अडगळीचे काय करायचे
हे मात्र शिक्षकांनी नव्हते शिकवले.

तेवढ्यात एक कल्पना सुचली.
" अडगळ" मधला 'अ' पुसला
क्षणात कॅनव्हास मोठा झाला.
मग आपुलकीचा गळ टाकून
उरलेला गड जिंकला.

मनाच्या आभाळात आता  सगळे
कसे निर्मळ आणि नितळ.
अगदी जसा आजोळच्या घरात
झिरपणारया कवडश्यातला सूर्यकिरण!