दरवर्षी प्रमाणेच श्रावण येतो आणि नेहमीच्या गणिती सुत्रासारख्या दिवस रात्रींना एक देखण वळण देऊन जातो. वातावरणातील तृप्तता अन हिरवी शालीनता ह्याच या ॠतूराजाच्या अस्तित्व् खुणा! उनपावसाच्या खेळात मंद सुगंधाने लपेटलेली नाजूक प्राजक्त फुलं अंगणभर सांडलेली दिसली कि घड्याळाच्या काट्यावर धावणारं मन क्षणभर थबकत आणि "गौरी गणपतीचा सण आला ग " असं मनाशीच म्हणत. तसे सगळेच उत्सव आपल्याला आवडतात. पण गौरीगणपतीचा सण एकूणच जीवनात प्राण भरणारा. रोजच्या दैनंदिनीतील सातत्यामुळे आलेली निरसता दूर करून उत्साह जागवणारा… नवी चेतना जागविणारा…
भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि त्या पाठोपाठ महालक्ष्मीचा उत्सव सुरु होतो. शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर देवीचे आगमन होते. ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मुळ नक्षत्रावर तिचे वसर्जन करतात. उत्पत्ती किंवा किंवा सृजन , त्यानंतर समृद्धी आणि मग अपरिहार्य असे विसर्जन किंवा विलय हे सृष्टीचक्र माणसाला समजावे त्यासाठीच देवीचा हा उत्सव. प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास देऊ लागला तेंव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा-विष्णू-महेश यांशी प्रार्थना केली मग त्रिमूर्तीनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले. महालक्ष्मीने कोलासुराला ठार मारून स्त्रियांना संकटमुक्त केले अशी एक आख्यायिका आहे.
खऱ्या अर्थाने हा उत्सव स्त्रियांचा आहे. आपले सौभाग्य, संतती आणि संपत्ती यांची जपणूक करणाऱ्या गौरीचे पूजन आजही प्रत्येक स्त्री मनोभावे करते. बदलत्या काळातील वाढलेल्या जबाबदाऱ्या पेलूनही आपले उत्सव शक्यतो पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा तिचा
प्रयत्न असतो. यामध्ये अवास्तव किंवा अतार्किक प्रथा ती टाळत जात आहे. आजच्या काळात भ्रष्टाचार, विषमता, लैगिक शोषण, मानसिक विकृती यासारखे कितीतरी कोलासुर निर्माण होत आहेत. त्यांचा सामना करण्यासाठी ह्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींकडून ती एक नवी प्रेरणा
घेणार आहे.
आपले स्वत्व, स्वाभिमान आणि संस्कृती जपण्यासाठी नव्या उमेदीन कामाला लागणार आहे. आजच्या प्रसार माध्यमांनी रंगवलेली स्त्री म्हणजे साप विंचू सारख्या अभद्र टिकल्या लावणारी, शरीराचं ओंगळवाण प्रदर्शन करणारी, श्रीमंतीची लालसा असणारी, नातेसंबंधांशी फारकत घेऊन आपलं घर उधळत निघालेली स्त्री. तिला सर्वशक्तीनिशी नाकारणार आहे. आपला वेश, आपली भाषा, आपला पारंपारिक आहार हे घेऊनच आपल्या संस्कृतिची सकस तत्व रुजविणारा हा उत्सव अतिशय उत्साहान अन श्रद्धेन साजरा करणार आहे.
समईच्या मंद प्रकाशात तेजाळलेले महालक्ष्मीचे सुबक, सात्विक मुखवटे, फुलोऱ्याचा दरवळ, आरतीचा घंटानाद, उत्सवासाठी आवर्जून एकत्र जमलेले आप्तस्वकीय, रांगोळी अन उदबत्तीच्या साथीन जमलेला सुग्रास जेवणाचा बेत, गप्पांची जागरणं, आणि आई- आज्जीचा श्रांत पण तृप्त समाधानी चेहरा. माझ्या मनाच्या कानव्हास वर उमटलेल्या ह्या चित्राने माझं आयुष्य गर्भ श्रीमंत केलंय. हा श्रीमंत वारसा माझ्या मुलांपर्यंत पोचवायला हवाय. जागतिकीकरणाच्या वाऱ्यात जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी श्रावणात मात्र आपल्या घराची वाट
शोधण्यासाठी…
