"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत. तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना. पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली. तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता. एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची. मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा. तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच. तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची. तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा. श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे. जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच. "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली. ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही. मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो. जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात. शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत. आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके' असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
"बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम. मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...