Sunday, January 20, 2013

भक्ती रंग

अनवट रागाच्या आलापीसारखा  
होता अनोळखी, अनाकलनीय 
रंग तो भक्तिरसाचा ...

नवरसांचा सरताज 
म्हणे कोणी तर 
कोणी मनाचा साज.

बुद्धिवादाच्या प्रखर प्रकाशात 
शोधूनही गवसत नव्हती 
ती सोपी पायवाट ...

माउलीला विश्वकल्याणाचे साकडे 
घालणाऱ्या ज्ञानोबाची.
"झडकरी येई ग विठ्ठला"
आर्ततेने आळवणाऱ्या नामदेवाची. 
भारुड गाणाऱ्या एकनाथाची. 
वृक्षवल्ली वनचरांशी सोयरीक 
साधणाऱ्या तुकोबाची.

वाटेवर त्या जाण्यासाठी 
भक्तीचा रंग ओळखण्यासाठी 
गरज नव्हती खरंच 
आध्यात्मिक अभ्यासाची.
कठीण प्रमेय सोडवण्याच्या 
गणिती तार्किकतेची.

हवं होत एक भाबड काळीज 
निस्सीम श्रद्धेन भारलेलं 
'अहं' विसरून लीनतेन वाकलेलं 
स्वतः ला शुन्य मानून 
समर्पित करणार ...

मग तो उंबरठा ओलांडला
आसावरीच्या सुरांनी भरलेला.
गाभाऱ्यागत घुमलेल्या गळ्यातून 
लख्ख ओंकार दाखवणारा.
अवघा रंग एकचि करणारा.

अनवट वाटा आता 
अगदी आपल्याश्या झालेल्या 
गुरुभक्तीच्या रंगात 
न्हाऊन गेलेल्या...

No comments:

Post a Comment