क्षितिजाच्या पार
अज्ञाताचा वेध घेत
एक अलगुज वाजत राही
अनघड, अनवट वाटांवरले
सूर अनोळखी मी शोधत जाई
क्षितिजाच्या पार
लाल केशरी रंग लाटांवर
ओथंबल्या आभाळाच्या निळाईत
काळ्या करड्या मातीतल्या
माझ्या अस्तित्वखुणा मी शोधत जाई
क्षितिजाच्या पार
शब्दब्र्म्हाची लेखनसीमा
नेणिवेच्या तीरावरला
अव्यक्त, अस्फुट जाणीवेचा
अर्थ नेमका मी शोधत जाई
क्षितिजाच्या पार
साकारलेला तो ओंकार
रंग-गंध-स्पर्शा पलीकडल्या
आकार,उकार अन मकारातला
निर्गुण निराकार मी शोधत जाई