पाणी
घनगर्द आभाळातल्या
सहस्त्र धारांतून
मनमुक्त बरसणारे
जीवन असतं पाणी !
सतत काळजी
करणाऱ्या
आईच्या डोळ्यातला
ओलावा असतं पाणी !
दऱ्या खोऱ्यातून धावत
खळाळत झरत
नदीत विसावणारा
प्रवाह असतं पाणी !
तळपत्या उन्हात
कष्टणाऱ्या बांधवांच्या
तनुवर ओघळणाऱ्या
घर्मधारा असतं पाणी !
कठीण खड्कातल्या
काळ्या कातळातून
धबाबा कोसळणारे
तोय असतं पाणी !
गूढ गाभारयातल्या
अभिषेकपात्रातून
शिवपिंडीवर झरणारे
जल असतं पाणी !
सानुल्या सुर्याकिरणात
अलवार पाकळीवर
चकाकणारा
दवबिंदू असतं पाणी !
चरचरणाऱ्या वेदनेला
सोसताना
खळकन निसटणारा
अश्रू असतं पाणी !
आणि...
खळांची व्यंकटी सांडून
सत्कर्मी रती वाढवणाऱ्या
ज्ञानदेवांच्या पसायदानातला
अर्णव असतं पाणी !
Khup chaan....
ReplyDelete