Thursday, March 8, 2012

ऋतुरंग



ऋतू ...कालमापनाचा एक तुकडा... मिनिट-तास , दिवस-रात्र, महिने-वर्ष, या सारखाच  खर  तर एक कालखंड .
पण या सर्व  संकल्पनांप्रमाणे ऋतू कधीही गणिती एकक म्हणून आपल्यासमोर येत नाही  तर तो घेऊन येतो ...सृष्टीवैभवाचे विविध गुणविशेष.  क्यालीडोस्कोप प्रमाणे कूस बदलून सृष्टीची भावविभोर रूपं  आपल्यासमोर मांडत जातो. "सहा ऋतूंचे सहा सोहळे " साजरे करणारे हे सृष्टीच्या रंगभूमीवरील महानाट्यच जणू.

काल गणनेच्या  बाबतीत आपल्या संस्कृतीचा आधार म्हणजे आपले पंचांग. पंचांगाची सुरुवात होते ती वसंत ऋतूने !

चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूने . सर्वत्र  कडक रखरखीत उन्हाळा. मोठाले दिवस. वातावरण तापलेले. सूर्याचे तेज असह्य झालेले.  वाऱ्याच्या लहानशा झुळकीसाठी जीव आसुसलेला असताना  त्याचे आगमन होते. वसंत ऋतू! ऋतुराज! भगवान श्रीकृष्णानेही गीतेत  "ऋतूनां कुसुमाकरः" असे म्हणून  ऋतुराज वसंताची बिरुदावली गाईली आहे. कडक उन्हात होरपळलेल्या  सृष्टीमध्ये वसंत ऋतू हिरवा चमत्कार घडवतो. झाडा-वेलींना हिरवीकंच कोवळी पालवी फुटते.  वातावरणात रानफुलांचा अन मोहरलेल्या आम्र वृक्षांचा गंध दरवळतो . फुलझाडे  तर अनावरपणे फुललेली दिसतात. गुलाब, चाफा,बाभूळ, मोगरा,सायली,निशिगंध ,रातराणी,बहावा, जास्वंद अन गुलमोहर. "पुष्पधूळीमाजी लोळे वसंत"या मुक्तेश्वरांच्या काव्यपंक्तींची साक्ष पटत जाते. 
सृजनाच्या साक्ष-खुणा उमटवणारा वसंत हा अमर आशावादाचे प्रतिक आहे.

जेष्ठ  आणि आषाढ  हे दोन महिने ग्रीष्म ऋतूचे.  वसंत ऋतूत सर्वत्र फुललेले पुष्प वैभव आता उतरणीला लागते.  हवेतला उकाडा वाढत चाललेला आहे.  निळ्या आकाशातल्या पांढऱ्या 
ढगांना कुठे कुठे काळी किनारदिसायला लागते. हळूहळू हा काळा रंग गडद होत जातो.  अन अवकाशाला घनत्व प्राप्त होते. मळभ दाटून येत राहते.  कधीतरी चुकून वळवाचा पाऊस पडतोही. पण तगमग काही थांबत नाही.  आषाढ लागतो अन मग मात्र ही अनावर प्रतीक्षा केलेली पाऊस पाऊले सृष्टीवर बरसतात. पारिजातकाचे सडे जागोजाग दिसायला लागतात.  
ग्रीष्म ऋतू असे टोकाचे दोन अनुभव देतो  अस्वस्थता आणि तृप्तता.

श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने वर्षा ऋतूचे.  वर्षा ऋतू हा खऱ्या अर्थाने सौंदर्य ऋतू आहे.  ग्रीष्मातली तगमग आता शांतवली आहे.  सर्वत्र अनेकविध छटानमध्ये हिरवा रंग उधळला आहे.
वातावरणात एक समाधानाची शांतता जाणवत असते.  अन त्याचबरोबर सणावारांची उत्साही 
धांदल.  मंगळागौर, नागपंचमी , गोकुळाष्टमी , पोळा, गणेशोस्तव , अशी सणांची नुसती रेलचेल.
"पातला वर्षाकाळ...पंचम ऋतू झाला प्रबळ" असं कवी मुक्तेश्वर म्हणतात.  तेंव्हा वर्षा ऋतुच 
मनावर असलेल प्रबळ पण सारख जाणवत राहत.  आसमंतातला ताजेपणा कसा मनात झिरपत 
झिरपत राहतो.  "क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरुनी उन पडे .  वरती बघता इंद्रधनुचा
गोफ दुहेरी विणलासे "  असा सगळा मनभावन आसमंत!  
हिरव्या पानांच्या रेषा-रेषांतून जगण्याची जाळी विणणारा , हिरव्या दानाच्या कौतुकात 
हरवलेला  अन सृजनाची लय गवसलेला असा हा वर्षा ऋतू !

अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे.  अश्विन येतो शक्तीची उपासना करण्याचे 
नवरात्रीचे दिवस घेऊन.  जप-तप-व्रत  करून आराधना करायची दैवी शक्तीची.  नऊच्या नऊ
दिवस अखंड दीप तेवत ठेऊन आई जगदंबेची  पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे
हे नवरात्राचे दिवस!  आणि दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार, व पराक्रमाची पूजा!
त्यापाठोपाठ  येणारी कोजागिरी पोर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव.  सोळा कलांनी फुललेल्या 
चंद्राचा उत्सव ! 
असा हा शरद ऋतू चा पूर्वार्ध.  आणि उत्तरार्ध तर अधिकच बहारदार. 
शरदऋतूच्या  उत्तरार्धात येते दिवाळी.  दीपोत्सव! आनंदाचा उत्सव! उल्ल्हासाचा उत्सव! 
प्रसन्नतेचा उत्सव! प्रकाशाचा उत्सव! दिवाळी हे अनेक उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. लक्ष्मी
बरोबरच अनेकविध नात्यांचे पदर घट्ट करणारा हा एक महोत्सव आहे.  
भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मिलन करणारा, विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने 
उत्सवाचा उल्हास अन जीवनच आनंद देणारा असा हा शरद ऋतू!

मार्गशीर्ष आणि पौष हे दोन महिने हेमंत ऋतूचे. रामायणात इष्ट ऋतू म्हणून हेमंत ऋतूला 
गौरविले आहे.  शरद ऋतूत चोर पावलाने आलेली थंडी आता चांगलीच स्थिरावली आहे.
थंडगार दिवस अन थंडगार रात्र. गारठ्यामुळे एकूणच जीवन व्यवहारात शिथिलता जाणवते.
दिवस लहान होत जातो.  गडद धुकं, अतिसौम्य सुर्यकिरणं .  सृष्टी देखील गारठल्यासारखी
वाटत राहते .  मार्गशीर्षात अशी टोकाची बधिरता अनुभवल्यावर सूर्य पौष महिन्यात मकर
राशीत प्रवेश करतो.  आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो अन उत्तरायण सुरु 
करतो.  सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे. सूर्य अन्धःकारावर आक्रमण
करण्याचा दृढ संकल्प करतो म्हणून अंधार हळूहळू कमी-कमी होत जातो. 
 "तमसो मां ज्योतिर्गमय " ही प्रार्थना सार्थ करणारा व परिवर्तनाची आकांक्षा जागवून
 संक्रमणाचा शुभ संकल्प करणारा हेमंत  ऋतू!

माघ आणि फाल्गुन हे दोन महिने शिशिर ऋतूचे.  याचे नाव शिशिर असले तरी या ऋतूत 
गारवा कमी व्हायला लागतो. दिवस वेगाने मोठा होतो.  तितक्याच वेगाने सूर्य पृथ्वीजवळ 
येतो.  वर्षभरात निरनिराळे उत्सव साजरे करून दमलेली सृष्टी आता विरक्तीच्या 
मनोभूमिकेत वाटते.  त्यातच माघ वद्य त्रयोदशीला येणारे शिवरात्रीचे व्रत शिवत्वाचा संदेश
देते.  शिव ही ज्ञानाची देवता आहे.  गंगा जशी शंकराच्या जटेतून निघते त्याप्रमाणे ज्ञानी 
माणसाच्या विशुद्ध बुद्धीत जीवनाच्या कठीण समस्यातून आरपार जाण्याची हिम्मत असली 
पाहिजे. असा हा 'साधेपणा हाच शृंगार ' मानणारा, जीवनात ज्ञानाला अधिष्टान देणारा 
शिशिर ऋतू!


अशा सहा ऋतू सोहळ्यांनी  आपल्या आयुष्यात जे रंग वैभव आणले आहे  त्यामुळेच आपले 
भावविश्व अधिक समृद्ध झाले आहे.  कडक उन्हाळ्यात जीव नकोसा झालेला असताना वसंत
ऋतू पळस,पांगारयाच्या फुलांतून जागोजागी  जीवनमयी श्रेष्ठ अशा लाल रंगाची उधळण 
करतो. ग्रीष्म ऋतूत चेतनामयी करडा अन नियतीचा प्रारंभ रंग काळा अशा दोन रंगांचे 
अधिराज्य जाणवत राहते.  वर्षा ऋतू हिरव्या रंगाचे निसर्गदान  उधळत येतो.  अधून मधून 
घन निळा बरसात राहतो.  जाईजुई अन प्राजक्त सड्यातून तेजस्वी पांढरा टपटपत राहतो.
शरद ऋतू उत्सवी रंग घून येतो. झेंडू-शेवंतीच्या फुलांनी सुगंधित होऊन जातो.  हेमंत ऋतू
धुक्याचे अवगुंठन लेऊन येतो.  या दिवसात स्वच्छ आकाश बघावं.  सूर्यसुद्धा कसा जिवलग 
मित्र वाटत राहतो.  निसर्गातला रंगोत्सव काहीसा स्तब्ध झाल्यासारखा वाटतो  तोच 
शिशिराची चाहूल लागते.  हलका पोपटी रंग निष्पर्ण काळ्या  फांद्यांच्या टोकावर सांडलेला
दिसला आणि शिरीषाचा  मृदू-मुलायम  स्पर्शगंध तरंगत आपल्यापर्यंत आला की, म्हणावं,
"अरे, वसंत ऋतू आलाच की!"

No comments:

Post a Comment