Sunday, November 28, 2010

रोजची पहाट




रात्रीच्या गंधभारल्या चांदण्यात
मनसोक्त न्हालेली पहाट उमलते.


"घे अजुन एक सुंदर उत्साही दिवस "
सहज मला म्हणते.


मी दरवाजा उघडून बाहेर येते
भरभरून श्वास घेते.


एक ताजा स्वच्छ नितळ प्रवाह
रंध्रारंध्रातून सळसळत जातो.


अंधारातूनही सरावलेल्या वाटेवरून चालताना
मैत्रिणींची आश्वासक सोबत असते.


कधी पश्चिमेला मावळतीकडे झुकलेली चांदणी
तर कधी पूर्वेकडे उगवतीच्या रंगांची उधळणी.


कधी मोगरीच्या मादक गंधाला
जाई जुइची सात्वीक सोबत
तर कधी नाजुक नवथर पालवीसाठी
प्राजक्त असतो टपटपत.


निसर्गाची मनभावी रुपं टिपतांना
मनाच्या निरगाठी उलगडत जातात.
पावलांच्या वाढत्या गतिबरोबर
गप्पादेखिल रंगत असतात.


आजचं  काहीच उद्या नाही.
नि उद्याचं परवा.
नव्या दिवसाचा नवा आभास
जसा नवाच असावा प्रत्येक श्वास.


फुलानी ओंजळ भरणारया मैत्रिणीच्या
साथीची मात्र रोजच मनात आस.

No comments:

Post a Comment