Tuesday, December 14, 2010
कृतज्ञ!
तुमच्या स्वरांचे बोट धरून
पहिल्यांदाच मोकळ| षड्ज लावला
अन नाद्ब्रह्माच्या या सुरेल ओंकाराला
काळजातुन एक हुंकार उमटला.
तेंव्हा माझ्या सामान्य स्वरासाठी
मग खरोखरच एक श्रुति मिळाली
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!
तुमच्या शिकवण्याने स्वरलयींबरोबरच
शब्दांचे सामर्थ्य जाणवले.
भजनातील भक्ति, गीतातील भाव
गझलेतील आर्तता, कवितेचे सौंदर्य
सिनेमातील गाणी, उर्दू शेरोशायरी
शिकण्यातला उत्साह वाढतच गेला
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!
हलके हलके गीतातले चांदणे मनात सांडत गेले
रोजच्या रुक्ष दैनंदिनिचेच एक गाणे झाले
कवितेतले मोर मग माझ्याही अंगणात उतरले
आणि
रंगात भिजलेले, अंगात भिनलेले
गळ्यात झुललेले, डोळ्यात फुललेले
सुर मी कवेत घेतले
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!
नसो नसेल कधी संगीत सभा गाजविल्या
संमेलने, स्पर्धा, मैफिली जिंकल्या
पण
मनाच्या कोपरयात मात्र लागलेत तंबोरे
जुळलेल्या तारांवर आता रंगलीय बंदिश
अन हा सुर नाही कधी कोमेजणारा
जसा तुमच्या अंगणातला प्राजक्त टपटपणारा!
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment