Wednesday, August 28, 2013

श्रावण सखा

"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत.  तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना.  पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली.  तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
 
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता.  एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची.  मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा.  तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच.  तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची.  तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा.  श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे.  जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
 
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच.  "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली.  ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही.  मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो.  जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात.  शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
 
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत.  आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके'  असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
          "बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
           बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि  रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम.  मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...
 

Saturday, March 9, 2013

आजी

आजी 

आठवणींची  भरते शाळा 
तिची रिकामी जागा छळते  
रूप करारी वात्सल्याचे 
सतत मनात तरळत रहाते . 

शेतकऱ्याची ती सुगृहिणी 
कष्टाळू अन स्वाभिमानी 
सदा सज्ज ती पदर खोचुनी 
क्षुधा शांती हा धर्म मानुनी . 

दुधातुपाची भरली भांडी 
तुप्तता तिच्या ह्रदयातून सांडी 
हसतमुखाने राबता सोशी 
लवलवती जणू वीज जशी . 

भाचे-पुतणे, लेकी-बाळी 
गडीमाणसे वा मोलकरणी 
लहान थोरांच्या गप्पांमध्ये 
मनापासून ती रमून जाई . 

कृश काया अन कांती गोरी 
कथाकथनाचे तंत्रही भारी 
तेजस्वी चेहरा अन डोळे निळे 
चाणाक्ष नजरेला दिसे आगळे . 

भूमिका प्रत्येक तिची 
लोभसवाणी जरी 
रम्य बालपण जपणारी 
लाडकी आजीच ती खरोखरी . 

Tuesday, February 19, 2013

मेरा कुछ सामान … 


मेरा कुछ सामान 
तुम्हारे पास पडा है … 

दिवस सुरु झाला 
गुलजारच्या गीतावर . 

पोळपाट-लाटण  झारा-कढई 
तीच गडबड तीच घाई . 

मन मात्र आज स्वस्थ निवांत 
थांबलेलं जणू त्या ओळीवर . 

फुलं तोडतांना 
आज मी 
फांदीलाही जरासं गोंजारलं . 
अन 
घरादाराला झटकतांना 
कवडशात चमकणाऱ्या 
उन्हालाही न्याहाळलं . 

हिरवळीवरलं ते 
पिवळधम्म फुलपाखरु,
सकाळी किंचित धक्क्यानं 
झंकारलेली तार,
छायाप्रकाशानं उमटवंलेलं 
भिंतीवरचं चित्र,

आणि मग आठवलेलं 
किती काही … 

मेरा कुछ सामान शायद 
पडा हैं मेरेही पास . 

Sunday, January 20, 2013

भक्ती रंग

अनवट रागाच्या आलापीसारखा  
होता अनोळखी, अनाकलनीय 
रंग तो भक्तिरसाचा ...

नवरसांचा सरताज 
म्हणे कोणी तर 
कोणी मनाचा साज.

बुद्धिवादाच्या प्रखर प्रकाशात 
शोधूनही गवसत नव्हती 
ती सोपी पायवाट ...

माउलीला विश्वकल्याणाचे साकडे 
घालणाऱ्या ज्ञानोबाची.
"झडकरी येई ग विठ्ठला"
आर्ततेने आळवणाऱ्या नामदेवाची. 
भारुड गाणाऱ्या एकनाथाची. 
वृक्षवल्ली वनचरांशी सोयरीक 
साधणाऱ्या तुकोबाची.

वाटेवर त्या जाण्यासाठी 
भक्तीचा रंग ओळखण्यासाठी 
गरज नव्हती खरंच 
आध्यात्मिक अभ्यासाची.
कठीण प्रमेय सोडवण्याच्या 
गणिती तार्किकतेची.

हवं होत एक भाबड काळीज 
निस्सीम श्रद्धेन भारलेलं 
'अहं' विसरून लीनतेन वाकलेलं 
स्वतः ला शुन्य मानून 
समर्पित करणार ...

मग तो उंबरठा ओलांडला
आसावरीच्या सुरांनी भरलेला.
गाभाऱ्यागत घुमलेल्या गळ्यातून 
लख्ख ओंकार दाखवणारा.
अवघा रंग एकचि करणारा.

अनवट वाटा आता 
अगदी आपल्याश्या झालेल्या 
गुरुभक्तीच्या रंगात 
न्हाऊन गेलेल्या...

Friday, June 22, 2012

मनातलं गाणं

मोगऱ्याचा दरवळ 
जुळलेले तंबोरे
षडज मध्यम संवाद
जोडीला हळवा गंधार
रंगलेला मालकंस .

वनराईतलं  मचाण 
पौर्णिमेची रात्र 
झिरपणारे चांदणे
सुस्वरे गाणारे पक्षी
अदभुत जंगलगान.

कातर संध्याकाळ 
गारठलेल घर
उबदार शाल 
मनभर दाटलेली उदासी
जोडीला आर्त गझल.

होळीचा उत्सव 
डी-जे चा पडघम
रंगांची उधळण 
थंडाई सोबत झुलत 
थिरकलेल गाणं.

गच्च दाटलेलं आभाळ 
पावसाची झिम्मड
मित्र-मैत्रिणींचा ताफा 
कॉफीचे कप 
धमाल अंताक्षरी .

माणसांच्या गर्दीत 
कामाच्या रगाड्यात 
रहदारीच्या धुरात 
हलकेच कानात  गुणगुणलेलं
मनातलं गाणं.



Sunday, June 17, 2012

Re-Union च्या निमित्ताने

तसे  आमचे  college एकदम भारी होते
विभागातले  Rank One होते.

प्राध्यापकांबद्दल तेंव्हा आदर वगेरे वाटायचा 
lecture attend करण्यात प्रामाणिकपणा असायचा 

बुक बँकेची पुस्तकं मिळवण्यासाठी 
सगळे आटापिटा करायचे
liabrary मध्ये बसून notes काढणारयाना
हुशार-बिशार मानायचे.

परीक्षेत answer -paper ला लावलेल्या 
supplements  च्या संख्येला महत्व होते
"विना सहकार नही उद्धार" 
हे तत्व सरसकट मान्य होते.

college मधले elections म्हणजे
प्रचंड धमाल असायची.
जिंकलेल्या president ने दिलेली 
सिनेमा पार्टी great वाटायची.

मुले-मुली आपसात अंतर ठेऊन असत
मुली सारख्या खुसू-खुसू हसत
तर मुले कट्ट्यावर बसून 
त्यांच्यावर comments करत.

mall  multiplex  branded गोष्टींची 
ओळख सुद्धा नव्हती 
साधा वडा-पाव ही देखील
चैनच होती.

रांगेत उभे राहून सिनेमाची तिकिटे 
काढण्यात काही अडचण नव्हती
"first day first show "   पाहणे 
ही आनंदाची परिसीमा होती.

college मध्ये आतासारखी fashion parade नसायची
थोडी smart राहणी ही आगाऊगिरी  मानायची
साध lectrure  बंक करण्याला गुंडगिरी म्हणायचे
पकडले गेले तर parents  ला निरोप जायचे.

graduation  होता-होता मुलीना चहा-पोह्याचे वेध लागायचे
तर मुलांचे पटकन नोकरी मिळवण्याचे plan  असायचे.
पगाराच्या package  चे फारसे attraction   नव्हते
पण Bank LIC   वाले थोडे भाव खाऊन असायचे.

एकूणच अभ्यास- करिअर बाबत 
सगळे अल्पसंतुष्ट असायचे 
CA ICWA  करणाऱ्यांबद्दल
मात्र सहानुभूती बाळगायचे.

अशा साध्याश्या जगातली 
साधीशी आपली मैत्री
टिकून राहणार याची 
होती मनापासून खात्री

e -mail - facebook - chatting नाही
फोन मोबाईल वर संपर्क नाही 
तरीही इतक्या वर्षानंतर भेटण्याची 
सर्वांची धडपड अगदी सही सही !!!

 

Thursday, June 14, 2012



माझ्याही मनात ...

माझ्याही  मनात  एक  राधा ...
 अरुपाची  ओढ जागवणाऱ्या 
मनातल्या  मोरपिसावर
जीव ओवाळून टाकणारी...

माझ्याही  मनात  एक  राधा ...
तन मन  हरपवणारी
ती बासरीची धून 
एकटीच ऐकत राहणारी...

माझ्याही मनात एक राधा...
सप्तरंगात रंगलेल्या 
दांडिया रासातील
केवळ श्यामरंग टिपणारी...

माझ्याही मनात एक राधा...
जगाला कर्मयोग 
देणारा योगेश्वर 
विरक्त प्रेमयोगात शोधणारी...