Tuesday, August 16, 2011

१५ ऑगस्ट...

एक असतो १५ ऑगस्ट. बालपणीचा.
स्वच्छ गणवेशाचा.
सावधान-विश्राम करता करता
ठोकलेल्या सल्युटचा.
निळ्या आभाळात फडकणाऱ्या
तिरंग्याकडे बघताना
वाटलेल्या अभिमानाचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. तरुणाईचा.
Happy Independence Day!
असं एकमेकांना wish करण्याचा.
patriotic feelings
facebook वर update करण्याचा.
कुठल्यातरी social cause साठी
मेणबत्ती पेटवण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट.सर्वसामान्यांचा.
सकाळी आरामात उठण्याचा.
बायको पोरांना पिकनिकला नेण्याचा.
जमलच तर मित्र मंडळीत
ओली पार्टी करण्याचा.
मॉलमध्ये चालता चालता
"ए मेरे वतन के लोगो" च्या
fusion song ला टाळी देण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. राजकारण्यांचा.
कडक इस्त्री केलेला खादी पेहराव
अंगावर चढवण्याचा.
दहशतवाद, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
अश्या डरकाळ्या फोडण्याचा.
शहीद-गरीब-बाल कल्याणाच्या नव्या योजना
जाहीर करून मोठा घोटाळा करण्याचा.
 
कधी असेल मग १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या जयघोषाचा?
बलिदानाच्या वेदीवर चढलेल्या क्रांतिकारकांचा?
सीमेवर एकाकी लढणाऱ्या सैनिकांचा?
इंग्रजी सत्तेला नमवणाऱ्या राष्ट्रभक्त नेत्यांचा?
अजूनही दिलेले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे करणाऱ्या  नागरिकांचा?
"हम होंगे कामयाब एक दिन" या विश्वासाचा?
अखंड, अतुल्य, अन अजिंक्य हिंदुस्तान या स्वप्नाचा?
 

Wednesday, August 3, 2011

श्रावणसखा...

"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत.  तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना.  पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली.  तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
 
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता.  एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची.  मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा.  तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच.  तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची.  तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा.  श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे.  जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
 
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच.  "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली.  ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही.  मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो.  जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात.  शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
 
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत.  आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके'  असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
          "बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
           बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम.  मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...

Thursday, February 17, 2011

अडगळ....


नव्या वर्षाची नवी डायरी
पानं सगळी करकरीत कोरी

वर्ष नवे संकल्प नवे
विचार नवे काव्य नवे
लिहू म्हटलं त्यावर काही
जे सगळ्यांना हवे हवे

जापनीज मनेजमेंट मधले
५ एस होते कुठेतरी डोक्यात
म्हणून पहिल्याच पानावर अक्षर लिहिले
" अडगळ"
अन क्षणभर त्याकडे बघत राहिले.
शब्द तसा काना,मात्रा आणि वेलांटीही नसलेला
पण अर्थ-चित्र-आठवणीनी फेर धरलेला.

शब्दकोशात अर्थ साधा सोपा.
नको असलेले, जागा अडवून बसलेले
कालबाह्य, उपयोग मूल्य नसलेले
असं बरंच काही....

डोळ्यांसमोरचे चित्र मात्र भारीच सुंदर
आजोळच्या घरातली ती अडगळीची खोली.
तिथला तो धुळकट गंध
उन्हाच्या कवडशात चमकणारी कोळीष्टक.

तिथ सापडलेली रिबीन आणि आकडा
फुटलेली पाटी अन पेन्सिलचा अर्धा तुकडा.
एकेक वस्तूच्या शंभर आठवणी
शाळेतले दिवस, अभ्यास आणि मैत्रिणी.

 क्लासमध्ये शिक्षक जेंव्हा शिकवत होते
जापनीज मनेजमेंट मधले 5 एस टेक्निक
'सेईरी' म्हणजे अडगळ आधी फेकून द्या
पुन्हा पुन्हा म्हणत होते.

म्हटलं मनाशी खरंच एकदा
काढून टाकू सगळीच अडगळ.

मनाला काजळी आणणारी
स्वार्थी, निराशावादी विचारांची अडगळ

समाजातील भ्रष्टाचार, जातीयवाद,
अन दहशतवादाची अडगळ.

पैशाच्या लोभापायी नातं विसरणारी
घोटाळे घडवणारी आर्थिक अडगळ.

माणुसकीला काळिमा फासणारी
सामाजिक अडगळ.

वरवर पाहता सर्व स्वच्छ झाले
अडगळीचे ढीग मात्र तसेच राहिले
कारण फेकून दिलेल्या अडगळीचे काय करायचे
हे मात्र शिक्षकांनी नव्हते शिकवले.

तेवढ्यात एक कल्पना सुचली.
" अडगळ" मधला 'अ' पुसला
क्षणात कॅनव्हास मोठा झाला.
मग आपुलकीचा गळ टाकून
उरलेला गड जिंकला.

मनाच्या आभाळात आता  सगळे
कसे निर्मळ आणि नितळ.
अगदी जसा आजोळच्या घरात
झिरपणारया कवडश्यातला सूर्यकिरण!

Wednesday, December 29, 2010

मित्राला आठवतांना...

राजाचं जाणं...
जणू एक अतर्क्य दुःस्वप्न!
वाटतं कोणीतरी जागं करावं 
अन हे अधटित पुसून टाकावं!


केवढं चैतन्यदायी उत्फुल्ल होतं 
सगळच त्याचं जगणं 
आपल्या बहुआयामी व्यक्तित्वानं
वातावरण भारुन टाकणं
 उस्फुर्त मार्मिक बोलण्यानं
एकेकाची विकेट घेणं


सर्वसामान्यांच्या सहवासात राहूनही
स्वतःचं असामा न्यत्व जपणं 
कर्त्तुत्वाच्य्या नव्या भरारया घेत 
उंच उंच जात राहणं
तरीही प्रत्येक क्षणी
सुढ़ुदांना आठवत राहणं


त्याच्या कित्येक गौरव प्रसंगी 
शब्दांच्या राशी उभ्या केल्या 
मात्र त्याच शब्दांनी आता
श्रद्धांजलिची ओंजळ करणं
नाही जमत... खरचं...


( २९ डिसेंबर )





Tuesday, December 14, 2010

कृतज्ञ!



तुमच्या स्वरांचे बोट धरून
पहिल्यांदाच मोकळ| षड्ज लावला
अन नाद्ब्रह्माच्या या सुरेल ओंकाराला
काळजातुन एक हुंकार उमटला.
तेंव्हा माझ्या सामान्य स्वरासाठी
मग खरोखरच एक श्रुति मिळाली
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


तुमच्या शिकवण्याने  स्वरलयींबरोबरच
शब्दांचे सामर्थ्य जाणवले.
भजनातील भक्ति, गीतातील भाव
गझलेतील आर्तता, कवितेचे सौंदर्य
सिनेमातील गाणी, उर्दू शेरोशायरी
शिकण्यातला उत्साह वाढतच गेला
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


हलके हलके गीतातले चांदणे मनात सांडत गेले
रोजच्या रुक्ष दैनंदिनिचेच एक गाणे झाले
कवितेतले मोर मग माझ्याही अंगणात उतरले
आणि
रंगात भिजलेले, अंगात भिनलेले
गळ्यात झुललेले, डोळ्यात फुललेले
सुर मी कवेत घेतले
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


नसो नसेल कधी संगीत सभा गाजविल्या
संमेलने, स्पर्धा, मैफिली जिंकल्या
पण
मनाच्या कोपरयात मात्र लागलेत तंबोरे
जुळलेल्या तारांवर आता रंगलीय बंदिश
अन हा सुर नाही कधी कोमेजणारा
जसा तुमच्या अंगणातला प्राजक्त टपटपणारा!
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!

Sunday, December 12, 2010

अरण्ययात्री की आनंदयात्री?



एखादी झक्कपैकी कोटी प्रत्यक्ष पु.लं.च्या तोंडून ऐकायला मिळणं, सहजच सुरेल तान लतादिदी घेत असतांना आपण शेजारी असणं, कुसुमाग्रजांच्या उत्कट कवितेच्या पहिल्या-वहिल्या अविष्काराला साक्षी होणं असे अनुभव ज्यांच्या भाग्यात लिहिले आहेत त्यांचं एकुण जगणंच समृद्ध होत असेल नाही?  आपापल्या क्षेत्रात अशा मान्यवरांनी अशी उंची गाठलेली असते की त्यांचा प्रत्येक शब्द वेदवाणीसमान भासावा.

अशाच एक अनुभवानं आपण क्षणोक्षणी समृद्ध होत आहोत असं मला वाटत राहिलं ते नागझिरयाच्या जंगलात. कारण या अरणययात्रेसाठी मार्गदर्शक होते प्रसिद्ध लेखक अणि अभ्यासक श्री. मारुतराव चित्तमपल्ली.  चित्तमपल्ली हे वृक्षवल्ली आणि वनचरांना सोयरे करून जगणारे प्रख्यात निसर्गमित्र. सूक्ष्म निरिक्षण, सखोल अभ्यास आणि अफाट अनुभव गाठी बांधलेल्या या रसिक वनविशारदाच्या तोंडून उलगडणारी जंगलातली अज्ञात रहस्ये आपल्याला स्तिमित करून टाकतात.  त्यातही नागझीरयावर चित्तमपल्लींचे विशेष प्रेम.



" नागझिरा".  महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील "विदर्भाचा मुकुटमणी" असे वर्णन केलेले एक सुंदर अभयारण्य. पूर्वीच्या काळ|त येथे गजराजांचे वास्तव्य असावे म्हणुनच या अभयारण्या|चे नाव नागझिरा पडले असावे कारण संस्कृत भाषेत 'नाग' या शब्दाचा अर्थ 'हत्ती' असा होतो.  एकूणच वृक्षवल्ली, वन्य प्राणी व पक्षांची विविधता व विपुलता विचारात घेउन नागझिरा अभयारण्य भारतातील खरया  अर्थाने एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखले जात आहे.  या सुंदर जंगलाचे सौन्दर्य जवळनं अनुभवण्यासाठी अनेक रानवाटा आहेत. लाल मातीचे नागमोडी रस्ते.
या रस्त्यांच्या दुतार्फा पर्ण पाचोळ| पसरलेला असतो. उन्हाळयात सर्वत्र ग्रीष्माच्या अमलाची छटा दिसते.  साग व इतर वृक्षांच्या पानगळीतुन  उंचच उंच वृक्षराजितुन मार्ग काढत ही वाट आपल्यापूढे निसर्गाचे अदभूतरम्य आविष्कार उलगडत जाते.

या निसर्गमार्गाने जाताना आपल्याला पाऊलखुणा दिसतात त्यामधे बिबट, सांबर, चितळ,ससे,मोर यांच्या अधिक असतात. सुगरण, बुलबुल, सुर्यपक्षी, शिंपी, गरुड यांची सुंदर घरटी दिसतात. मोर, गिधाडे, पोपट, बगळयांची  पिसे सापडतात. जमिनीवर किंवा झाडांच्या बुंध्यावरील प्राण्यानी केलेल्या खुणा आढळतात. साळीनदरानं बुंध्यावरील केलेल्या खुणा किंवा चितळ|ने झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा, रानडुकरानं खोद्लेली जमीन दिसते.  प्राण्याचे उरलेले खाद्य तसेच पाणपक्षांची अर्धवट खाल्लेली फळ, पाने, मासे, तसेच त्यांची विष्टाही नजरेस पड़ते.
अर्थात या सर्व गोष्टींचे निरिक्षण करणे व त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी एक अभ्यासू नजर लागते तरच हे अरण्यवाचन सहजसाध्य होते.  चित्तमपल्ली आपल्याला अरणय वाचन तर शिकवतातच शिवाय पक्षी निरिक्षण कसे करायचे तेहि समजाउन सांगतात.  झाडे, पशु, पक्षी यांच्या  बद्दल मनोरंजक माहिती देतात.  आदिवासी लोकजीवनातील भाबड्या समजुती, दंतकथा, जंगलातील वास्तव्यात आलेले गूढ़ अनुभव सांगतात. पर्यावरणाविषयी सजग करतात. त्याचबरोबर त्यांच्या साहित्यात ज्यांचा आवर्जुन नामोल्लेख आढळतो असे माधवराव पाटिल व  टं|गसु महाजन यांचीही भेट घडवतात.  या दोघांचे ग्रामीण बोलीभाषेतील मजेदार किस्से ऐकतांना खुपच धमाल येते.
ते बोलताना येणारे शब्द -  मोरनाची, रमदाळणे, रानहेला, चाम, बटर, हरोली, चकवा- चांदण - नकळतपणे जंगलातील संस्कृतीची ओळख करून देतात. 

संत ज्ञानेश्वर म्हणतात, "शब्द गंधाचिये बुंधारे" म्हणजेच झाडांचे वास/आवाज आकाशतत्वावर गोंदविले गेलेले असतात.  हे चित्तमपल्ली आपल्याला पटवून देतात.  वेद-उपनिषद, गीता, पुराण ग्रंथ याबरोबरच जवळपास बारा भाषा अवगत असल्याने कित्येक परदेशी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेला तरीही प्रसिद्धि परांगमुख असलेला महान व्यासंगी, ऋषितुल्य  माणूस आपल्याला एका निराळयाच विश्वात घेउन जातो.  आणि संत रामदास स्वामी "सुखासाठी अरण्य सेवीत जावे" असे का म्हणतात याचा प्रत्यय घेण्यासाठी निसर्गराजाच्या प्रत्यक्ष दरबारात जाण्याचे धाडस करावे असे नक्कीच वाटायला लागते. 
आणि मग ती रात्र उजाड़ते. 
घनदाट जंगलात शांत, सुंदर पौर्णिमेच्या रात्री जवळपास पंचवीस ते तीस फुट उंच अशा मचाणावर कुठलाही आवाज न करता, हालचाल न करता बसायचं. सर्वत्र नीरव शांतता, रातव्याची स्वरसाथ घेउन अनेक पक्षांचे सुरेल कुजन, मधुनच सांबर, चितळ यांची साद, स्तब्ध उभी असलेली उंचच उंच झाडं, पारलौकीकाचा अनुभव देणारे जंगलाचे ते अस्पर्शी सौंदर्य आणि एकुणच आसमंतातील गुढ़तेला प्रसन्नतेची शीतल झालर देणारा चंद्राचा दुधाळ  रेशमी प्रकाश अशी मैफिल जमल्यावर " आपुलाची वाद आपणासी" या उक्तीचा प्रत्यय यायला लागतो.

आणि
पाणवठयावर  मोठ्या डौलाने चालत येणारा बिबट्या श्वास रोधुन बघताना जीव थरारून जातो.

तेंव्हा मात्र हा आगळ|-वेगळ|  अनुभव देणाऱ्या चित्तमपल्लींना अरण्ययात्री न म्हणता आनंदयात्री
म्हणावसं वाटतं!



Saturday, December 11, 2010

नातं मायलेकीचं ....









दुधात साखर विरघळ|वी तसं
कुटुम्बात आपलं स्वतंत्र अस्तित्व
पुसून टाकण्याऱ्या पिढीतली
माझी आई.
कष्ट अणि काटकसर ही तारांबळ सांभाळत
शांत आणि समाधानी रहाण्याची
किमया तिला साधली.


वयाच्या प्रत्येक टप्प्यावर
आई मला वेगवेगळी वाटली.
तिच्या माझ्या नात्याचं पोत न्याहाळतांना
मी तिला माझ्या कवितेत शोधली.


बाळपणी आई सर्वस्व वाटली.
माझे तान्हेपण तिच्या संरक्षक ओटीत ठेवलेली.
मऊसुत गोधडीची उब त्याला अलगद वेढलेली.


पुढे शाळेत पाउल पडलं, तिचं बोट सोडतांना
काळीज भित्र्या सशागत झालं
मग शाळ| आवडायला लागली.
प्रत्येक छोटी छोटी गोष्ट
आईला सांगण्याची ओढ़ वाढली.


पुढचं पाउल वरच्या वर्गात.
माझं क्षितिज विस्तारत होतं.
आता मात्र आईसाठी काही कवाडं बंद झाली.
तिच्यापरिस मैत्रिणींच्या सहवासाची गोडी
अधिक वाटू लागली.


वाढत्या वयाच्या उंबरठयावर
आई खरं तर शत्रूच झाली.
तिच्या एकेक बंधनांना,
डोळ्यात तेल घालून जपण्याच्या काळजीला
मनात बंडखोरी दाटून आली.
कारण
आई तेंव्हा अगदीच orthodox वाटली.


नंतर करियरच्या वाटेवर नोकरी करण्याची वेळ आली.
प्रत्येक अडचणीत आई अगदी पाठीराखीण झाली.
Time Management चे धड़े शिकवतांना
आता ती माझी councellor झाली.


लग्न झालं.
संसारातल्या जबाबदाऱ्या, नातीगोती सांभाळतांना
आई फारच great वाटली.
व्यवहाराचे उभे आडवे धागे विणतांना
मनातले हळवे कोपरे जपणारी
ती एक प्रेमळ सावली बनली.


सौंदर्य, सुजाणपणा, सहकार्य
सामंजस्य, सहनशक्ति, समर्पण
या  शब्दांचे अर्थ प्रत्यक्षात जगणारी आई
मला तरी एक dictionary वाटली.


मग आई होण्याची वेळ आली.
तिच्या हातच्या चवीसाठी मनात आस दाटून आली.
पावलोपावली जपणाऱ्या  तिच्या डोळ्यातली काळजी
आता अगदी हवीहवीशी वाटली.


हातात माझ्या माझी छकुली.
माझ्या गर्भात वाढलेली.
जणू माझीच दूसरी सावली
झाली मात्र आईची लाडकी नातुली.


तिचं खाणंपिणं, तिची आजारपणं,
तिचं चालणं, तिचं बोलणं,
वेळी अवेळी सल्ला मागतांना
आई माझी family doctor झाली.


वयाच्या नाजुक वळणावर सोनुली उभी राहिली.
आईच्या मनातली काळजी आता माझ्याही डोळ्यात उतरली.
लेकीवरती मी मैत्रीची शाल पांघरली.
तीही मग विश्वासानं मनातलं सगळ बोलू लागली.


आणि मग एक दिवस
अलगद गळ्यात पडून
चक्क मला  ती
' I LOVE YOU " म्हणाली.


तिच्या शब्दानी सुखावलेली
माझ्यातली मुलगी मात्र एकदम गलबलली.


अगं, तुझ्यापेक्षा कांकणभर सरस
असं आईपण निभावालेल्या स्वतःच्या आईला
तुला मात्र अशी पावती
कधीच कां द्यावीशी नाही वाटली ?