Tuesday, August 2, 2016

तो कोसळतोय बाहेर
सहस्त्रधारानी...
झाडांवर पानांवर
रस्त्यावर छपरावर!

त्या गूढ़ अगम्य
आकाशाशी
जुळतय काही
क्षणाधार्त!

झिरपतोय आता
तो हळूहळू
खोल आत
सोलुन काढलीय त्यान
काळजावरली
निबर झालेली कातडी

कोवळ काही आता
अंकुरेल तिथ सहज...
इतक्या वर्षांच्या

अनुभवांच
सावध शहाणपण
धुवून टाकलय लख्ख
नव्यान बघावस

वाटतय आयुष्य
वेड्या भाबड्या नजरेन्
पुनः एकदा...
वाढदिवस...

एक सूंदर संधी!
Celebrity सारख मिरवाव
छानस तयार होउन
स्वतःला न्याहाळाव
कधीही न गायलेल
गाण गुणगुणाव्
एक गिरकी घेऊन
थोडस थिरकाव
हलकीशी शीळ घालून
आतल्या 'मी' ला जागवाव
स्वतःसाठी जगलेले क्षण
स्तब्ध होउन आठवाव
"purpose of life"
थोडस philosophical व्हाव
नजरेच्या टप्प्यातल्या नवीन
वळणवाटांना शोधाव

Chocolate party
Gifts hotel
बाकी सगळ दुसरयासाठी
आपल्यासाठी आपल्यापुरत
अस सेलिब्रेशन नक्की कराव

Celebrate being YOU!

Wednesday, September 11, 2013

" सण महालक्ष्मीचा "


दरवर्षी प्रमाणेच श्रावण येतो आणि नेहमीच्या गणिती सुत्रासारख्या दिवस रात्रींना एक देखण वळण देऊन जातो.  वातावरणातील तृप्तता अन हिरवी शालीनता ह्याच या ॠतूराजाच्या अस्तित्व् खुणा!  उनपावसाच्या  खेळात मंद सुगंधाने लपेटलेली नाजूक प्राजक्त फुलं अंगणभर सांडलेली दिसली कि घड्याळाच्या काट्यावर धावणारं मन क्षणभर थबकत  आणि "गौरी गणपतीचा सण आला ग " असं मनाशीच म्हणत. तसे सगळेच उत्सव आपल्याला आवडतात. पण गौरीगणपतीचा सण  एकूणच जीवनात प्राण भरणारा.  रोजच्या दैनंदिनीतील सातत्यामुळे आलेली निरसता दूर करून उत्साह जागवणारा… नवी चेतना जागविणारा… 

भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणरायाचे आगमन होते आणि त्या पाठोपाठ महालक्ष्मीचा उत्सव सुरु होतो.  शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर देवीचे आगमन होते. ज्येष्ठा नक्षत्रावर तिची पूजा करतात आणि मुळ  नक्षत्रावर तिचे वसर्जन करतात.  उत्पत्ती किंवा किंवा सृजन , त्यानंतर समृद्धी  आणि मग अपरिहार्य असे विसर्जन किंवा विलय  हे सृष्टीचक्र माणसाला समजावे त्यासाठीच देवीचा हा उत्सव.  प्राचीन काळी कोलासुर नावाचा दैत्य स्त्रियांना फार त्रास देऊ लागला तेंव्हा सर्व स्त्रियांनी ब्रह्मा-विष्णू-महेश यांशी प्रार्थना केली मग त्रिमूर्तीनी कोलासुराचा नाश करण्याचे कार्य महालक्ष्मीवर सोपवले.   महालक्ष्मीने कोलासुराला ठार मारून स्त्रियांना संकटमुक्त केले अशी एक आख्यायिका आहे. 

खऱ्या अर्थाने हा उत्सव स्त्रियांचा आहे.  आपले सौभाग्य, संतती आणि संपत्ती यांची जपणूक करणाऱ्या गौरीचे पूजन आजही प्रत्येक स्त्री मनोभावे करते.  बदलत्या काळातील वाढलेल्या जबाबदाऱ्या पेलूनही आपले उत्सव शक्यतो पारंपारिक पद्धतीने साजरा करण्याचा तिचा 
प्रयत्न असतो. यामध्ये अवास्तव किंवा अतार्किक प्रथा ती टाळत जात आहे. आजच्या काळात भ्रष्टाचार, विषमता, लैगिक शोषण, मानसिक विकृती यासारखे कितीतरी कोलासुर निर्माण होत आहेत.  त्यांचा सामना करण्यासाठी ह्या ज्येष्ठा-कनिष्ठा गौरींकडून ती एक नवी प्रेरणा 
घेणार आहे. 

आपले स्वत्व, स्वाभिमान आणि संस्कृती जपण्यासाठी नव्या उमेदीन कामाला लागणार आहे.  आजच्या प्रसार माध्यमांनी रंगवलेली स्त्री म्हणजे साप विंचू सारख्या अभद्र टिकल्या लावणारी, शरीराचं ओंगळवाण प्रदर्शन करणारी, श्रीमंतीची लालसा असणारी, नातेसंबंधांशी फारकत घेऊन आपलं घर उधळत निघालेली स्त्री. तिला सर्वशक्तीनिशी नाकारणार आहे.  आपला वेश, आपली भाषा, आपला पारंपारिक आहार हे घेऊनच आपल्या संस्कृतिची सकस तत्व रुजविणारा हा उत्सव अतिशय उत्साहान अन श्रद्धेन साजरा करणार आहे. 

समईच्या मंद प्रकाशात तेजाळलेले महालक्ष्मीचे सुबक, सात्विक मुखवटे, फुलोऱ्याचा दरवळ, आरतीचा घंटानाद, उत्सवासाठी आवर्जून एकत्र जमलेले आप्तस्वकीय, रांगोळी अन उदबत्तीच्या साथीन जमलेला सुग्रास जेवणाचा बेत, गप्पांची जागरणं, आणि आई- आज्जीचा श्रांत पण तृप्त समाधानी चेहरा.  माझ्या मनाच्या कानव्हास वर उमटलेल्या ह्या चित्राने माझं आयुष्य गर्भ श्रीमंत केलंय. हा श्रीमंत वारसा माझ्या मुलांपर्यंत पोचवायला हवाय.  जागतिकीकरणाच्या  वाऱ्यात जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी श्रावणात मात्र आपल्या घराची वाट 
शोधण्यासाठी…  


Wednesday, August 28, 2013

श्रावण सखा

"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत.  तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना.  पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली.  तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
 
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता.  एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची.  मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा.  तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच.  तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची.  तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा.  श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे.  जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
 
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच.  "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली.  ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही.  मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो.  जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात.  शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
 
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत.  आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके'  असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
          "बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
           बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि  रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम.  मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...
 

Saturday, March 9, 2013

आजी

आजी 

आठवणींची  भरते शाळा 
तिची रिकामी जागा छळते  
रूप करारी वात्सल्याचे 
सतत मनात तरळत रहाते . 

शेतकऱ्याची ती सुगृहिणी 
कष्टाळू अन स्वाभिमानी 
सदा सज्ज ती पदर खोचुनी 
क्षुधा शांती हा धर्म मानुनी . 

दुधातुपाची भरली भांडी 
तुप्तता तिच्या ह्रदयातून सांडी 
हसतमुखाने राबता सोशी 
लवलवती जणू वीज जशी . 

भाचे-पुतणे, लेकी-बाळी 
गडीमाणसे वा मोलकरणी 
लहान थोरांच्या गप्पांमध्ये 
मनापासून ती रमून जाई . 

कृश काया अन कांती गोरी 
कथाकथनाचे तंत्रही भारी 
तेजस्वी चेहरा अन डोळे निळे 
चाणाक्ष नजरेला दिसे आगळे . 

भूमिका प्रत्येक तिची 
लोभसवाणी जरी 
रम्य बालपण जपणारी 
लाडकी आजीच ती खरोखरी . 

Tuesday, February 19, 2013

मेरा कुछ सामान … 


मेरा कुछ सामान 
तुम्हारे पास पडा है … 

दिवस सुरु झाला 
गुलजारच्या गीतावर . 

पोळपाट-लाटण  झारा-कढई 
तीच गडबड तीच घाई . 

मन मात्र आज स्वस्थ निवांत 
थांबलेलं जणू त्या ओळीवर . 

फुलं तोडतांना 
आज मी 
फांदीलाही जरासं गोंजारलं . 
अन 
घरादाराला झटकतांना 
कवडशात चमकणाऱ्या 
उन्हालाही न्याहाळलं . 

हिरवळीवरलं ते 
पिवळधम्म फुलपाखरु,
सकाळी किंचित धक्क्यानं 
झंकारलेली तार,
छायाप्रकाशानं उमटवंलेलं 
भिंतीवरचं चित्र,

आणि मग आठवलेलं 
किती काही … 

मेरा कुछ सामान शायद 
पडा हैं मेरेही पास . 

Sunday, January 20, 2013

भक्ती रंग

अनवट रागाच्या आलापीसारखा  
होता अनोळखी, अनाकलनीय 
रंग तो भक्तिरसाचा ...

नवरसांचा सरताज 
म्हणे कोणी तर 
कोणी मनाचा साज.

बुद्धिवादाच्या प्रखर प्रकाशात 
शोधूनही गवसत नव्हती 
ती सोपी पायवाट ...

माउलीला विश्वकल्याणाचे साकडे 
घालणाऱ्या ज्ञानोबाची.
"झडकरी येई ग विठ्ठला"
आर्ततेने आळवणाऱ्या नामदेवाची. 
भारुड गाणाऱ्या एकनाथाची. 
वृक्षवल्ली वनचरांशी सोयरीक 
साधणाऱ्या तुकोबाची.

वाटेवर त्या जाण्यासाठी 
भक्तीचा रंग ओळखण्यासाठी 
गरज नव्हती खरंच 
आध्यात्मिक अभ्यासाची.
कठीण प्रमेय सोडवण्याच्या 
गणिती तार्किकतेची.

हवं होत एक भाबड काळीज 
निस्सीम श्रद्धेन भारलेलं 
'अहं' विसरून लीनतेन वाकलेलं 
स्वतः ला शुन्य मानून 
समर्पित करणार ...

मग तो उंबरठा ओलांडला
आसावरीच्या सुरांनी भरलेला.
गाभाऱ्यागत घुमलेल्या गळ्यातून 
लख्ख ओंकार दाखवणारा.
अवघा रंग एकचि करणारा.

अनवट वाटा आता 
अगदी आपल्याश्या झालेल्या 
गुरुभक्तीच्या रंगात 
न्हाऊन गेलेल्या...

Friday, June 22, 2012

मनातलं गाणं

मोगऱ्याचा दरवळ 
जुळलेले तंबोरे
षडज मध्यम संवाद
जोडीला हळवा गंधार
रंगलेला मालकंस .

वनराईतलं  मचाण 
पौर्णिमेची रात्र 
झिरपणारे चांदणे
सुस्वरे गाणारे पक्षी
अदभुत जंगलगान.

कातर संध्याकाळ 
गारठलेल घर
उबदार शाल 
मनभर दाटलेली उदासी
जोडीला आर्त गझल.

होळीचा उत्सव 
डी-जे चा पडघम
रंगांची उधळण 
थंडाई सोबत झुलत 
थिरकलेल गाणं.

गच्च दाटलेलं आभाळ 
पावसाची झिम्मड
मित्र-मैत्रिणींचा ताफा 
कॉफीचे कप 
धमाल अंताक्षरी .

माणसांच्या गर्दीत 
कामाच्या रगाड्यात 
रहदारीच्या धुरात 
हलकेच कानात  गुणगुणलेलं
मनातलं गाणं.



Sunday, June 17, 2012

Re-Union च्या निमित्ताने

तसे  आमचे  college एकदम भारी होते
विभागातले  Rank One होते.

प्राध्यापकांबद्दल तेंव्हा आदर वगेरे वाटायचा 
lecture attend करण्यात प्रामाणिकपणा असायचा 

बुक बँकेची पुस्तकं मिळवण्यासाठी 
सगळे आटापिटा करायचे
liabrary मध्ये बसून notes काढणारयाना
हुशार-बिशार मानायचे.

परीक्षेत answer -paper ला लावलेल्या 
supplements  च्या संख्येला महत्व होते
"विना सहकार नही उद्धार" 
हे तत्व सरसकट मान्य होते.

college मधले elections म्हणजे
प्रचंड धमाल असायची.
जिंकलेल्या president ने दिलेली 
सिनेमा पार्टी great वाटायची.

मुले-मुली आपसात अंतर ठेऊन असत
मुली सारख्या खुसू-खुसू हसत
तर मुले कट्ट्यावर बसून 
त्यांच्यावर comments करत.

mall  multiplex  branded गोष्टींची 
ओळख सुद्धा नव्हती 
साधा वडा-पाव ही देखील
चैनच होती.

रांगेत उभे राहून सिनेमाची तिकिटे 
काढण्यात काही अडचण नव्हती
"first day first show "   पाहणे 
ही आनंदाची परिसीमा होती.

college मध्ये आतासारखी fashion parade नसायची
थोडी smart राहणी ही आगाऊगिरी  मानायची
साध lectrure  बंक करण्याला गुंडगिरी म्हणायचे
पकडले गेले तर parents  ला निरोप जायचे.

graduation  होता-होता मुलीना चहा-पोह्याचे वेध लागायचे
तर मुलांचे पटकन नोकरी मिळवण्याचे plan  असायचे.
पगाराच्या package  चे फारसे attraction   नव्हते
पण Bank LIC   वाले थोडे भाव खाऊन असायचे.

एकूणच अभ्यास- करिअर बाबत 
सगळे अल्पसंतुष्ट असायचे 
CA ICWA  करणाऱ्यांबद्दल
मात्र सहानुभूती बाळगायचे.

अशा साध्याश्या जगातली 
साधीशी आपली मैत्री
टिकून राहणार याची 
होती मनापासून खात्री

e -mail - facebook - chatting नाही
फोन मोबाईल वर संपर्क नाही 
तरीही इतक्या वर्षानंतर भेटण्याची 
सर्वांची धडपड अगदी सही सही !!!

 

Thursday, June 14, 2012



माझ्याही मनात ...

माझ्याही  मनात  एक  राधा ...
 अरुपाची  ओढ जागवणाऱ्या 
मनातल्या  मोरपिसावर
जीव ओवाळून टाकणारी...

माझ्याही  मनात  एक  राधा ...
तन मन  हरपवणारी
ती बासरीची धून 
एकटीच ऐकत राहणारी...

माझ्याही मनात एक राधा...
सप्तरंगात रंगलेल्या 
दांडिया रासातील
केवळ श्यामरंग टिपणारी...

माझ्याही मनात एक राधा...
जगाला कर्मयोग 
देणारा योगेश्वर 
विरक्त प्रेमयोगात शोधणारी...



Thursday, March 8, 2012

ऋतुरंग



ऋतू ...कालमापनाचा एक तुकडा... मिनिट-तास , दिवस-रात्र, महिने-वर्ष, या सारखाच  खर  तर एक कालखंड .
पण या सर्व  संकल्पनांप्रमाणे ऋतू कधीही गणिती एकक म्हणून आपल्यासमोर येत नाही  तर तो घेऊन येतो ...सृष्टीवैभवाचे विविध गुणविशेष.  क्यालीडोस्कोप प्रमाणे कूस बदलून सृष्टीची भावविभोर रूपं  आपल्यासमोर मांडत जातो. "सहा ऋतूंचे सहा सोहळे " साजरे करणारे हे सृष्टीच्या रंगभूमीवरील महानाट्यच जणू.

काल गणनेच्या  बाबतीत आपल्या संस्कृतीचा आधार म्हणजे आपले पंचांग. पंचांगाची सुरुवात होते ती वसंत ऋतूने !

चैत्र आणि वैशाख हे दोन महिने वसंत ऋतूने . सर्वत्र  कडक रखरखीत उन्हाळा. मोठाले दिवस. वातावरण तापलेले. सूर्याचे तेज असह्य झालेले.  वाऱ्याच्या लहानशा झुळकीसाठी जीव आसुसलेला असताना  त्याचे आगमन होते. वसंत ऋतू! ऋतुराज! भगवान श्रीकृष्णानेही गीतेत  "ऋतूनां कुसुमाकरः" असे म्हणून  ऋतुराज वसंताची बिरुदावली गाईली आहे. कडक उन्हात होरपळलेल्या  सृष्टीमध्ये वसंत ऋतू हिरवा चमत्कार घडवतो. झाडा-वेलींना हिरवीकंच कोवळी पालवी फुटते.  वातावरणात रानफुलांचा अन मोहरलेल्या आम्र वृक्षांचा गंध दरवळतो . फुलझाडे  तर अनावरपणे फुललेली दिसतात. गुलाब, चाफा,बाभूळ, मोगरा,सायली,निशिगंध ,रातराणी,बहावा, जास्वंद अन गुलमोहर. "पुष्पधूळीमाजी लोळे वसंत"या मुक्तेश्वरांच्या काव्यपंक्तींची साक्ष पटत जाते. 
सृजनाच्या साक्ष-खुणा उमटवणारा वसंत हा अमर आशावादाचे प्रतिक आहे.

जेष्ठ  आणि आषाढ  हे दोन महिने ग्रीष्म ऋतूचे.  वसंत ऋतूत सर्वत्र फुललेले पुष्प वैभव आता उतरणीला लागते.  हवेतला उकाडा वाढत चाललेला आहे.  निळ्या आकाशातल्या पांढऱ्या 
ढगांना कुठे कुठे काळी किनारदिसायला लागते. हळूहळू हा काळा रंग गडद होत जातो.  अन अवकाशाला घनत्व प्राप्त होते. मळभ दाटून येत राहते.  कधीतरी चुकून वळवाचा पाऊस पडतोही. पण तगमग काही थांबत नाही.  आषाढ लागतो अन मग मात्र ही अनावर प्रतीक्षा केलेली पाऊस पाऊले सृष्टीवर बरसतात. पारिजातकाचे सडे जागोजाग दिसायला लागतात.  
ग्रीष्म ऋतू असे टोकाचे दोन अनुभव देतो  अस्वस्थता आणि तृप्तता.

श्रावण आणि भाद्रपद हे दोन महिने वर्षा ऋतूचे.  वर्षा ऋतू हा खऱ्या अर्थाने सौंदर्य ऋतू आहे.  ग्रीष्मातली तगमग आता शांतवली आहे.  सर्वत्र अनेकविध छटानमध्ये हिरवा रंग उधळला आहे.
वातावरणात एक समाधानाची शांतता जाणवत असते.  अन त्याचबरोबर सणावारांची उत्साही 
धांदल.  मंगळागौर, नागपंचमी , गोकुळाष्टमी , पोळा, गणेशोस्तव , अशी सणांची नुसती रेलचेल.
"पातला वर्षाकाळ...पंचम ऋतू झाला प्रबळ" असं कवी मुक्तेश्वर म्हणतात.  तेंव्हा वर्षा ऋतुच 
मनावर असलेल प्रबळ पण सारख जाणवत राहत.  आसमंतातला ताजेपणा कसा मनात झिरपत 
झिरपत राहतो.  "क्षणात येते सरसर शिरवे , क्षणात फिरुनी उन पडे .  वरती बघता इंद्रधनुचा
गोफ दुहेरी विणलासे "  असा सगळा मनभावन आसमंत!  
हिरव्या पानांच्या रेषा-रेषांतून जगण्याची जाळी विणणारा , हिरव्या दानाच्या कौतुकात 
हरवलेला  अन सृजनाची लय गवसलेला असा हा वर्षा ऋतू !

अश्विन आणि कार्तिक हे दोन महिने शरद ऋतूचे.  अश्विन येतो शक्तीची उपासना करण्याचे 
नवरात्रीचे दिवस घेऊन.  जप-तप-व्रत  करून आराधना करायची दैवी शक्तीची.  नऊच्या नऊ
दिवस अखंड दीप तेवत ठेऊन आई जगदंबेची  पूजा करून तिच्यापासून शक्ती प्राप्त करण्याचे
हे नवरात्राचे दिवस!  आणि दसरा म्हणजे वीरतेचे वैभव, शौर्याचा शृंगार, व पराक्रमाची पूजा!
त्यापाठोपाठ  येणारी कोजागिरी पोर्णिमा म्हणजे जागृतीचा उत्सव.  सोळा कलांनी फुललेल्या 
चंद्राचा उत्सव ! 
असा हा शरद ऋतू चा पूर्वार्ध.  आणि उत्तरार्ध तर अधिकच बहारदार. 
शरदऋतूच्या  उत्तरार्धात येते दिवाळी.  दीपोत्सव! आनंदाचा उत्सव! उल्ल्हासाचा उत्सव! 
प्रसन्नतेचा उत्सव! प्रकाशाचा उत्सव! दिवाळी हे अनेक उत्सवांचे स्नेहसंमेलन आहे. लक्ष्मी
बरोबरच अनेकविध नात्यांचे पदर घट्ट करणारा हा एक महोत्सव आहे.  
भक्ती आणि शक्ती यांचे पवित्र मिलन करणारा, विशुद्ध मनाने आणि निर्मळ अंतःकरणाने 
उत्सवाचा उल्हास अन जीवनच आनंद देणारा असा हा शरद ऋतू!

मार्गशीर्ष आणि पौष हे दोन महिने हेमंत ऋतूचे. रामायणात इष्ट ऋतू म्हणून हेमंत ऋतूला 
गौरविले आहे.  शरद ऋतूत चोर पावलाने आलेली थंडी आता चांगलीच स्थिरावली आहे.
थंडगार दिवस अन थंडगार रात्र. गारठ्यामुळे एकूणच जीवन व्यवहारात शिथिलता जाणवते.
दिवस लहान होत जातो.  गडद धुकं, अतिसौम्य सुर्यकिरणं .  सृष्टी देखील गारठल्यासारखी
वाटत राहते .  मार्गशीर्षात अशी टोकाची बधिरता अनुभवल्यावर सूर्य पौष महिन्यात मकर
राशीत प्रवेश करतो.  आपली पृथ्वीकडील परिभ्रमणाची दिशा बदलतो अन उत्तरायण सुरु 
करतो.  सूर्याच्या संक्रमणाशी जीवनाचे संक्रमण जोडलेले आहे. सूर्य अन्धःकारावर आक्रमण
करण्याचा दृढ संकल्प करतो म्हणून अंधार हळूहळू कमी-कमी होत जातो. 
 "तमसो मां ज्योतिर्गमय " ही प्रार्थना सार्थ करणारा व परिवर्तनाची आकांक्षा जागवून
 संक्रमणाचा शुभ संकल्प करणारा हेमंत  ऋतू!

माघ आणि फाल्गुन हे दोन महिने शिशिर ऋतूचे.  याचे नाव शिशिर असले तरी या ऋतूत 
गारवा कमी व्हायला लागतो. दिवस वेगाने मोठा होतो.  तितक्याच वेगाने सूर्य पृथ्वीजवळ 
येतो.  वर्षभरात निरनिराळे उत्सव साजरे करून दमलेली सृष्टी आता विरक्तीच्या 
मनोभूमिकेत वाटते.  त्यातच माघ वद्य त्रयोदशीला येणारे शिवरात्रीचे व्रत शिवत्वाचा संदेश
देते.  शिव ही ज्ञानाची देवता आहे.  गंगा जशी शंकराच्या जटेतून निघते त्याप्रमाणे ज्ञानी 
माणसाच्या विशुद्ध बुद्धीत जीवनाच्या कठीण समस्यातून आरपार जाण्याची हिम्मत असली 
पाहिजे. असा हा 'साधेपणा हाच शृंगार ' मानणारा, जीवनात ज्ञानाला अधिष्टान देणारा 
शिशिर ऋतू!


अशा सहा ऋतू सोहळ्यांनी  आपल्या आयुष्यात जे रंग वैभव आणले आहे  त्यामुळेच आपले 
भावविश्व अधिक समृद्ध झाले आहे.  कडक उन्हाळ्यात जीव नकोसा झालेला असताना वसंत
ऋतू पळस,पांगारयाच्या फुलांतून जागोजागी  जीवनमयी श्रेष्ठ अशा लाल रंगाची उधळण 
करतो. ग्रीष्म ऋतूत चेतनामयी करडा अन नियतीचा प्रारंभ रंग काळा अशा दोन रंगांचे 
अधिराज्य जाणवत राहते.  वर्षा ऋतू हिरव्या रंगाचे निसर्गदान  उधळत येतो.  अधून मधून 
घन निळा बरसात राहतो.  जाईजुई अन प्राजक्त सड्यातून तेजस्वी पांढरा टपटपत राहतो.
शरद ऋतू उत्सवी रंग घून येतो. झेंडू-शेवंतीच्या फुलांनी सुगंधित होऊन जातो.  हेमंत ऋतू
धुक्याचे अवगुंठन लेऊन येतो.  या दिवसात स्वच्छ आकाश बघावं.  सूर्यसुद्धा कसा जिवलग 
मित्र वाटत राहतो.  निसर्गातला रंगोत्सव काहीसा स्तब्ध झाल्यासारखा वाटतो  तोच 
शिशिराची चाहूल लागते.  हलका पोपटी रंग निष्पर्ण काळ्या  फांद्यांच्या टोकावर सांडलेला
दिसला आणि शिरीषाचा  मृदू-मुलायम  स्पर्शगंध तरंगत आपल्यापर्यंत आला की, म्हणावं,
"अरे, वसंत ऋतू आलाच की!"

Saturday, February 25, 2012

क्षितिजाच्या पार




क्षितिजाच्या पार 
अज्ञाताचा वेध घेत 
एक अलगुज वाजत राही
 अनघड, अनवट वाटांवरले
सूर अनोळखी मी शोधत जाई

क्षितिजाच्या पार 
लाल केशरी रंग लाटांवर
ओथंबल्या आभाळाच्या निळाईत
काळ्या करड्या मातीतल्या
माझ्या अस्तित्वखुणा मी शोधत जाई

क्षितिजाच्या पार 
शब्दब्र्म्हाची लेखनसीमा
नेणिवेच्या तीरावरला 
अव्यक्त, अस्फुट जाणीवेचा
अर्थ नेमका मी शोधत जाई

क्षितिजाच्या पार 
साकारलेला तो ओंकार
रंग-गंध-स्पर्शा पलीकडल्या
आकार,उकार अन मकारातला
निर्गुण निराकार मी शोधत जाई






Thursday, February 16, 2012

पाणी

पाणी 

घनगर्द आभाळातल्या 
सहस्त्र  धारांतून
मनमुक्त बरसणारे
जीवन असतं पाणी !
          सतत काळजी 
          करणाऱ्या 
          आईच्या डोळ्यातला 
          ओलावा असतं पाणी  !
दऱ्या खोऱ्यातून धावत
खळाळत झरत
नदीत विसावणारा 
प्रवाह  असतं पाणी  !
           तळपत्या उन्हात 
           कष्टणाऱ्या बांधवांच्या 
           तनुवर ओघळणाऱ्या 
           घर्मधारा  असतं पाणी  !
कठीण खड्कातल्या
काळ्या कातळातून 
धबाबा कोसळणारे
तोय  असतं पाणी  !
           गूढ गाभारयातल्या
           अभिषेकपात्रातून 
           शिवपिंडीवर झरणारे
           जल  असतं पाणी  !
सानुल्या सुर्याकिरणात 
अलवार पाकळीवर 
चकाकणारा 
दवबिंदू  असतं पाणी  !
            चरचरणाऱ्या वेदनेला 
            सोसताना 
            खळकन निसटणारा
            अश्रू  असतं पाणी  !
आणि...
खळांची व्यंकटी सांडून 
सत्कर्मी रती वाढवणाऱ्या 
ज्ञानदेवांच्या पसायदानातला
अर्णव  असतं पाणी  !

Friday, November 18, 2011

स्वर माधुरीच्या मंदिरात

त्या स्वरातलं माधुर्य
जाणवलं कितीदा तरी


सहज बोलताना
निर्मळ हसताना
नातवंडाना लटके रागवताना
क्लासमध्ये शिकवताना
स्वर-शिल्प उभारताना
अनवट राग आळवताना

पण कालच्या मैफिलीत
होता फक्त अमूर्त स्वर.
अन एकेका स्वर लडी मधून
घडत होत सुंदर स्वर मंदिर!

वाटलं जगात या क्षणी
एकच शाश्वत सत्य
तो म्हणजे फक्त हा "स्वर"
शुद्ध...नितळ...सात्विक...
अस्तित्वाच्या जाणिवा
विसरून टाकणारा...
पारलौकिकाचा स्पर्श
झालेला दैवी "स्वर".

मनात आलं, कशासाठी करायचा
अनवट रागांचे रागनियम
लयकारीचे गणित
सरगम ओळखण्याचा अट्टाहास?

मला या स्वरातले निखळपण कळले आहे
मी या स्वरापर्यंत पोहोचते आहे
मी हा स्वर माझ्यामध्ये अनुभवते आहे
अन कदाचित मीच हा "स्वर" झाले आहे.

Tuesday, August 16, 2011

१५ ऑगस्ट...

एक असतो १५ ऑगस्ट. बालपणीचा.
स्वच्छ गणवेशाचा.
सावधान-विश्राम करता करता
ठोकलेल्या सल्युटचा.
निळ्या आभाळात फडकणाऱ्या
तिरंग्याकडे बघताना
वाटलेल्या अभिमानाचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. तरुणाईचा.
Happy Independence Day!
असं एकमेकांना wish करण्याचा.
patriotic feelings
facebook वर update करण्याचा.
कुठल्यातरी social cause साठी
मेणबत्ती पेटवण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट.सर्वसामान्यांचा.
सकाळी आरामात उठण्याचा.
बायको पोरांना पिकनिकला नेण्याचा.
जमलच तर मित्र मंडळीत
ओली पार्टी करण्याचा.
मॉलमध्ये चालता चालता
"ए मेरे वतन के लोगो" च्या
fusion song ला टाळी देण्याचा.
 
एक असतो १५ ऑगस्ट. राजकारण्यांचा.
कडक इस्त्री केलेला खादी पेहराव
अंगावर चढवण्याचा.
दहशतवाद, भ्रष्टाचार खपवून घेणार नाही
अश्या डरकाळ्या फोडण्याचा.
शहीद-गरीब-बाल कल्याणाच्या नव्या योजना
जाहीर करून मोठा घोटाळा करण्याचा.
 
कधी असेल मग १५ ऑगस्ट स्वातंत्र्याच्या जयघोषाचा?
बलिदानाच्या वेदीवर चढलेल्या क्रांतिकारकांचा?
सीमेवर एकाकी लढणाऱ्या सैनिकांचा?
इंग्रजी सत्तेला नमवणाऱ्या राष्ट्रभक्त नेत्यांचा?
अजूनही दिलेले काम निष्ठेने, प्रामाणिकपणे करणाऱ्या  नागरिकांचा?
"हम होंगे कामयाब एक दिन" या विश्वासाचा?
अखंड, अतुल्य, अन अजिंक्य हिंदुस्तान या स्वप्नाचा?
 

Wednesday, August 3, 2011

श्रावणसखा...

"हसरा नाचरा जरासा लाजरा श्रावण आला" ही कवी कुसुमाग्रजांची कविता वाचली
आणि "श्रावणमासी हर्ष मानसी" ही बालकवींची कविता अभ्यासली तेंव्हापासूनच
श्रावण महिन्याविषयी एक विशेष कुतूहल जागल होत.  तसं पाहिलं तर वर्षभरातील
इतर बारा महिन्यांसारखाच हा एक महिना.  पण त्याची खासियत अनेकपरींनी समजत
गेली. जाणवत गेली.  तनामनावर नवचैतन्याची बरसात करणारी ओळखीची खुण सतत
कुठेतरी पटत गेली त्यामुळेच मनाच्या एका कोपरयात या श्रावणसरी झिरमिरत राहिल्या.
 
अगदी लहानपणी श्रावण दिसला तो सण-समारंभात. आजी-आजोबांच्या व्रतवैकल्यात.
लहानपण सगळ आजोळी गेलं.शेतकऱ्याच घर. येणाऱ्या-जाणाऱ्यांचा राबता.  एरवी
सकाळपासून रात्री झोपेपर्यंत कामात बुडालेली माझी आजी श्रावणी सोमवारी मात्र
संध्याकाळीच निवांत मोकळी अशी आमच्या वाट्याला यायची.  मग आमचा
सागर गोट्यांचा खेळ रंगायचा.  तेंव्हा वर्षातला प्रत्येक सोमवार श्रावणी असावा असंच
वाटायच.  तिला श्रावणातल्या वारांच्या कहाण्या वाचून दाखवताना एका निराळ्याच
जगाची ओळख व्हायची.  तांदळाचे तीन दाणे घेऊन आदित्यराणूबाईची कथा ऐकताना
तिचा चेहरा भाबड्या भक्तीने फुललेला असे. खुलभर दुधाची कहाणी, निर्मल मळे,उदकाचे
तळे यासारखी लयबद्ध रचना, उतशील मातशील, घेतला वसा टाकून देशील या शब्दातला
धाक अद्भुतरम्य विश्वाची सफर घडवायचा.  श्रावणातल्या देवादिकांना अनेकविध फुल-पान
वाहणाऱ्या माझ्या आजोबांचा चेहरा वेगळ्याच आनंदान मोहरलेला असे.  जमिनीची तृप्तता
त्यांच्या चेहऱ्यावरील प्रत्येक सुरकुतीतून झिरपलेली दिसे.
 
तेंव्हा जी श्रावणाशी गट्टी जमली ती कायमचीच.  "रिमझिम झरती श्रावणधारा" व
"श्रावणात घन निळा बरसला" यासारख्या गाण्यांनी श्रावणाच उत्कृष्ट चित्र मनात रेखाटल
त्यामुळे सृष्टीतले बदल टिपण्याची एक दृष्टी आली.  ग्रीष्मातल ते उदास,भकास रूप कात
टाकल्यागत झटकून सृष्टी अचानक एखद्या लावण्यवतीसारखी भासायला लागते आणि मग
हे उत्साही सृजनशील चैतन्य कधी आपल्यात उतरलं हे लक्षातही येत नाही.  मनात एक
छानसा पक्षी गाण गायला लागतो. आणि सगळे क्लेशदायक विचार कधीच पळ काढतात.
पावसात चिंब भिजत अवघा निसर्ग कवेत घ्यावासा वाटतो.  जाई-जुईच्या गंधभारल्या
हवेत झोके घ्यावेसे वाटतात.  शब्दांशी मैत्री करून कविता करावीशी वाटते.
 
खर तर विचारांचं इतक सुंदर जग आपल्या मनाच्या वस्तीला होत हे आधी कळत नाही.
त्यासाठी श्रावणाशी एक पाऊस नात जडाव लागत.  आषाढातला ' नन्ही,नन्ही बुन्दन गर्जे और
चहू ओरसे बिजली चमके'  असा धसमुसळा पाऊस श्रावणात अगदी अलवार होऊन जातो.
          "बुंद बुंद परत जैसी मोतन की लरीया
           बुंद बुंद कर ताल गरवा मेहरवा"
अशा अलगद येणाऱ्या श्रावणाला मनमुरादपणे अंगावर घ्याव आणि रोजच्या रामरगाड्यात
कुठेतरी ढकलून दिलेलं स्वतःच रूप न्याहाळाव. शोधाव्या त्या हळव्या दुखरया पाऊलखुणा,
आनंदाचे, अभिमानाचे क्षण; कायमसाठी पारखे झालेल्या सुर्हूदांच्या आठवणी; शब्दांचे,
स्पर्शांचे, अन भावनांचे विभ्रम.  मनाच्या खोल तळातून जुने सगळे हिशेब वर आणावेत.
मन अगदी मोकळ करून रित..रिकाम... होऊन जाव...अगदी विश्वासान... कारण हा आहे
आपला जिवलग सखा...श्रावण सखा...

Thursday, February 17, 2011

अडगळ....


नव्या वर्षाची नवी डायरी
पानं सगळी करकरीत कोरी

वर्ष नवे संकल्प नवे
विचार नवे काव्य नवे
लिहू म्हटलं त्यावर काही
जे सगळ्यांना हवे हवे

जापनीज मनेजमेंट मधले
५ एस होते कुठेतरी डोक्यात
म्हणून पहिल्याच पानावर अक्षर लिहिले
" अडगळ"
अन क्षणभर त्याकडे बघत राहिले.
शब्द तसा काना,मात्रा आणि वेलांटीही नसलेला
पण अर्थ-चित्र-आठवणीनी फेर धरलेला.

शब्दकोशात अर्थ साधा सोपा.
नको असलेले, जागा अडवून बसलेले
कालबाह्य, उपयोग मूल्य नसलेले
असं बरंच काही....

डोळ्यांसमोरचे चित्र मात्र भारीच सुंदर
आजोळच्या घरातली ती अडगळीची खोली.
तिथला तो धुळकट गंध
उन्हाच्या कवडशात चमकणारी कोळीष्टक.

तिथ सापडलेली रिबीन आणि आकडा
फुटलेली पाटी अन पेन्सिलचा अर्धा तुकडा.
एकेक वस्तूच्या शंभर आठवणी
शाळेतले दिवस, अभ्यास आणि मैत्रिणी.

 क्लासमध्ये शिक्षक जेंव्हा शिकवत होते
जापनीज मनेजमेंट मधले 5 एस टेक्निक
'सेईरी' म्हणजे अडगळ आधी फेकून द्या
पुन्हा पुन्हा म्हणत होते.

म्हटलं मनाशी खरंच एकदा
काढून टाकू सगळीच अडगळ.

मनाला काजळी आणणारी
स्वार्थी, निराशावादी विचारांची अडगळ

समाजातील भ्रष्टाचार, जातीयवाद,
अन दहशतवादाची अडगळ.

पैशाच्या लोभापायी नातं विसरणारी
घोटाळे घडवणारी आर्थिक अडगळ.

माणुसकीला काळिमा फासणारी
सामाजिक अडगळ.

वरवर पाहता सर्व स्वच्छ झाले
अडगळीचे ढीग मात्र तसेच राहिले
कारण फेकून दिलेल्या अडगळीचे काय करायचे
हे मात्र शिक्षकांनी नव्हते शिकवले.

तेवढ्यात एक कल्पना सुचली.
" अडगळ" मधला 'अ' पुसला
क्षणात कॅनव्हास मोठा झाला.
मग आपुलकीचा गळ टाकून
उरलेला गड जिंकला.

मनाच्या आभाळात आता  सगळे
कसे निर्मळ आणि नितळ.
अगदी जसा आजोळच्या घरात
झिरपणारया कवडश्यातला सूर्यकिरण!

Wednesday, December 29, 2010

मित्राला आठवतांना...

राजाचं जाणं...
जणू एक अतर्क्य दुःस्वप्न!
वाटतं कोणीतरी जागं करावं 
अन हे अधटित पुसून टाकावं!


केवढं चैतन्यदायी उत्फुल्ल होतं 
सगळच त्याचं जगणं 
आपल्या बहुआयामी व्यक्तित्वानं
वातावरण भारुन टाकणं
 उस्फुर्त मार्मिक बोलण्यानं
एकेकाची विकेट घेणं


सर्वसामान्यांच्या सहवासात राहूनही
स्वतःचं असामा न्यत्व जपणं 
कर्त्तुत्वाच्य्या नव्या भरारया घेत 
उंच उंच जात राहणं
तरीही प्रत्येक क्षणी
सुढ़ुदांना आठवत राहणं


त्याच्या कित्येक गौरव प्रसंगी 
शब्दांच्या राशी उभ्या केल्या 
मात्र त्याच शब्दांनी आता
श्रद्धांजलिची ओंजळ करणं
नाही जमत... खरचं...


( २९ डिसेंबर )





Tuesday, December 14, 2010

कृतज्ञ!



तुमच्या स्वरांचे बोट धरून
पहिल्यांदाच मोकळ| षड्ज लावला
अन नाद्ब्रह्माच्या या सुरेल ओंकाराला
काळजातुन एक हुंकार उमटला.
तेंव्हा माझ्या सामान्य स्वरासाठी
मग खरोखरच एक श्रुति मिळाली
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


तुमच्या शिकवण्याने  स्वरलयींबरोबरच
शब्दांचे सामर्थ्य जाणवले.
भजनातील भक्ति, गीतातील भाव
गझलेतील आर्तता, कवितेचे सौंदर्य
सिनेमातील गाणी, उर्दू शेरोशायरी
शिकण्यातला उत्साह वाढतच गेला
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


हलके हलके गीतातले चांदणे मनात सांडत गेले
रोजच्या रुक्ष दैनंदिनिचेच एक गाणे झाले
कवितेतले मोर मग माझ्याही अंगणात उतरले
आणि
रंगात भिजलेले, अंगात भिनलेले
गळ्यात झुललेले, डोळ्यात फुललेले
सुर मी कवेत घेतले
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!


नसो नसेल कधी संगीत सभा गाजविल्या
संमेलने, स्पर्धा, मैफिली जिंकल्या
पण
मनाच्या कोपरयात मात्र लागलेत तंबोरे
जुळलेल्या तारांवर आता रंगलीय बंदिश
अन हा सुर नाही कधी कोमेजणारा
जसा तुमच्या अंगणातला प्राजक्त टपटपणारा!
म्हणुनच गुरुवर्य मी कृतज्ञ!

Sunday, December 12, 2010

अरण्ययात्री की आनंदयात्री?



एखादी झक्कपैकी कोटी प्रत्यक्ष पु.लं.च्या तोंडून ऐकायला मिळणं, सहजच सुरेल तान लतादिदी घेत असतांना आपण शेजारी असणं, कुसुमाग्रजांच्या उत्कट कवितेच्या पहिल्या-वहिल्या अविष्काराला साक्षी होणं असे अनुभव ज्यांच्या भाग्यात लिहिले आहेत त्यांचं एकुण जगणंच समृद्ध होत असेल नाही?  आपापल्या क्षेत्रात अशा मान्यवरांनी अशी उंची गाठलेली असते की त्यांचा प्रत्येक शब्द वेदवाणीसमान भासावा.

अशाच एक अनुभवानं आपण क्षणोक्षणी समृद्ध होत आहोत असं मला वाटत राहिलं ते नागझिरयाच्या जंगलात. कारण या अरणययात्रेसाठी मार्गदर्शक होते प्रसिद्ध लेखक अणि अभ्यासक श्री. मारुतराव चित्तमपल्ली.  चित्तमपल्ली हे वृक्षवल्ली आणि वनचरांना सोयरे करून जगणारे प्रख्यात निसर्गमित्र. सूक्ष्म निरिक्षण, सखोल अभ्यास आणि अफाट अनुभव गाठी बांधलेल्या या रसिक वनविशारदाच्या तोंडून उलगडणारी जंगलातली अज्ञात रहस्ये आपल्याला स्तिमित करून टाकतात.  त्यातही नागझीरयावर चित्तमपल्लींचे विशेष प्रेम.



" नागझिरा".  महाराष्ट्राच्या गोंदिया जिल्ह्यातील "विदर्भाचा मुकुटमणी" असे वर्णन केलेले एक सुंदर अभयारण्य. पूर्वीच्या काळ|त येथे गजराजांचे वास्तव्य असावे म्हणुनच या अभयारण्या|चे नाव नागझिरा पडले असावे कारण संस्कृत भाषेत 'नाग' या शब्दाचा अर्थ 'हत्ती' असा होतो.  एकूणच वृक्षवल्ली, वन्य प्राणी व पक्षांची विविधता व विपुलता विचारात घेउन नागझिरा अभयारण्य भारतातील खरया  अर्थाने एक उत्कृष्ट अभयारण्य म्हणून ओळखले जात आहे.  या सुंदर जंगलाचे सौन्दर्य जवळनं अनुभवण्यासाठी अनेक रानवाटा आहेत. लाल मातीचे नागमोडी रस्ते.
या रस्त्यांच्या दुतार्फा पर्ण पाचोळ| पसरलेला असतो. उन्हाळयात सर्वत्र ग्रीष्माच्या अमलाची छटा दिसते.  साग व इतर वृक्षांच्या पानगळीतुन  उंचच उंच वृक्षराजितुन मार्ग काढत ही वाट आपल्यापूढे निसर्गाचे अदभूतरम्य आविष्कार उलगडत जाते.

या निसर्गमार्गाने जाताना आपल्याला पाऊलखुणा दिसतात त्यामधे बिबट, सांबर, चितळ,ससे,मोर यांच्या अधिक असतात. सुगरण, बुलबुल, सुर्यपक्षी, शिंपी, गरुड यांची सुंदर घरटी दिसतात. मोर, गिधाडे, पोपट, बगळयांची  पिसे सापडतात. जमिनीवर किंवा झाडांच्या बुंध्यावरील प्राण्यानी केलेल्या खुणा आढळतात. साळीनदरानं बुंध्यावरील केलेल्या खुणा किंवा चितळ|ने झाडावर शिंगे घासल्याच्या खुणा, रानडुकरानं खोद्लेली जमीन दिसते.  प्राण्याचे उरलेले खाद्य तसेच पाणपक्षांची अर्धवट खाल्लेली फळ, पाने, मासे, तसेच त्यांची विष्टाही नजरेस पड़ते.
अर्थात या सर्व गोष्टींचे निरिक्षण करणे व त्यातून निष्कर्ष काढण्यासाठी एक अभ्यासू नजर लागते तरच हे अरण्यवाचन सहजसाध्य होते.  चित्तमपल्ली आपल्याला अरणय वाचन तर शिकवतातच शिवाय पक्षी निरिक्षण कसे करायचे तेहि समजाउन सांगतात.  झाडे, पशु, पक्षी यांच्या  बद्दल मनोरंजक माहिती देतात.  आदिवासी लोकजीवनातील भाबड्या समजुती, दंतकथा, जंगलातील वास्तव्यात आलेले गूढ़ अनुभव सांगतात. पर्यावरणाविषयी सजग करतात. त्याचबरोबर त्यांच्या साहित्यात ज्यांचा आवर्जुन नामोल्लेख आढळतो असे माधवराव पाटिल व  टं|गसु महाजन यांचीही भेट घडवतात.  या दोघांचे ग्रामीण बोलीभाषेतील मजेदार किस्से ऐकतांना खुपच धमाल येते.
ते बोलताना येणारे शब्द -  मोरनाची, रमदाळणे, रानहेला, चाम, बटर, हरोली, चकवा- चांदण - नकळतपणे जंगलातील संस्कृतीची ओळख करून देतात. 

संत ज्ञानेश्वर म्हणतात, "शब्द गंधाचिये बुंधारे" म्हणजेच झाडांचे वास/आवाज आकाशतत्वावर गोंदविले गेलेले असतात.  हे चित्तमपल्ली आपल्याला पटवून देतात.  वेद-उपनिषद, गीता, पुराण ग्रंथ याबरोबरच जवळपास बारा भाषा अवगत असल्याने कित्येक परदेशी लेखकांच्या साहित्याचे वाचन केलेला तरीही प्रसिद्धि परांगमुख असलेला महान व्यासंगी, ऋषितुल्य  माणूस आपल्याला एका निराळयाच विश्वात घेउन जातो.  आणि संत रामदास स्वामी "सुखासाठी अरण्य सेवीत जावे" असे का म्हणतात याचा प्रत्यय घेण्यासाठी निसर्गराजाच्या प्रत्यक्ष दरबारात जाण्याचे धाडस करावे असे नक्कीच वाटायला लागते. 
आणि मग ती रात्र उजाड़ते. 
घनदाट जंगलात शांत, सुंदर पौर्णिमेच्या रात्री जवळपास पंचवीस ते तीस फुट उंच अशा मचाणावर कुठलाही आवाज न करता, हालचाल न करता बसायचं. सर्वत्र नीरव शांतता, रातव्याची स्वरसाथ घेउन अनेक पक्षांचे सुरेल कुजन, मधुनच सांबर, चितळ यांची साद, स्तब्ध उभी असलेली उंचच उंच झाडं, पारलौकीकाचा अनुभव देणारे जंगलाचे ते अस्पर्शी सौंदर्य आणि एकुणच आसमंतातील गुढ़तेला प्रसन्नतेची शीतल झालर देणारा चंद्राचा दुधाळ  रेशमी प्रकाश अशी मैफिल जमल्यावर " आपुलाची वाद आपणासी" या उक्तीचा प्रत्यय यायला लागतो.

आणि
पाणवठयावर  मोठ्या डौलाने चालत येणारा बिबट्या श्वास रोधुन बघताना जीव थरारून जातो.

तेंव्हा मात्र हा आगळ|-वेगळ|  अनुभव देणाऱ्या चित्तमपल्लींना अरण्ययात्री न म्हणता आनंदयात्री
म्हणावसं वाटतं!